नारायणी धाम मंदिराजवळील फुटपाथवर सापळा रचून अटक : ५०,००० रुपयांचा गावठी कट्टा जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने गुरुवारी मोठी कामगिरी करत गावठी बनावटीचा कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. अटक केलेल्या आरोपीकडून ५० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याप्रकरणी पुढील तपास सुरू असून आरोपीच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
दि. ११ जुलै २०२५ रोजी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी हे पेट्रोलिंग करत असताना, त्यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सरहद चौकाकडून वंडर सिटीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत नारायणी धाम मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या फुटपाथवर एक इसम गावठी बनावटीचा कट्टा घेऊन थांबलेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली व संशयित इसमाचा शोध घेतला. पोलीसांनी त्याठिकाणी निखील सचिन यादव (वय २४ वर्षे, रा. धनकवडी, पुणे) या तरुणाला संशयावरून ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे ५०,००० रुपयांचा गावठी बनावटीचा कट्टा सापडला.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी एक आरोपी पसार असून त्याचा शोध सुरु आहे. ही उल्लेखनीय कारवाई मा. अमितेश कुमार (पोलीस आयुक्त, पुणे शहर), मा. रंजनकुमार शर्मा (सह पोलीस आयुक्त), मा. राजेश बनसोडे (अपर पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग), मा. मिलींद मोहीते (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २) व मा. राहुल आवारे (सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, तुकाराम सुतार व संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे. पोलीस तपास अधिक गतीने सुरू असून आरोपीच्या इतर साथीदारांचा लवकरच पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
