सासवड रस्त्यावरील घटना : फुरसुंगी पोलिसांनी केली सहा जणांना अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : धक्का लागल्याच्या वादातून टोळक्याने मामाला दांडक्याने बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील उरळी देवाची परिसरात घडली. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. टोळक्याच्या मारहाणीत दोघेजण जखमी झाले आहेत.
रामलोचन हुसेनी कोरी (वय ४६, रा. नारंग ट्रान्सपोर्ट, उरळी देवाची, मूळ रा. उत्तरप्रदेश) असे खून झालेल्याचे नाव आहे. टोळक्याच्या मारहाणीत धीरज राम (वय २५) आणि संतकुमार कोरी (वय २५, रा. उरळी देवाची, फुरसुंगी) हे दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी प्रेमलाल सुरतनाम कुमरे (वय २१), देवेस वसंत धुर्वे (वय २२), संजय पुल्स मसराम (वय २८), रणजीत प्रकाश जाधव (वय २०), सतीश भरत कुमरे (वय १८) आणि विशाल मनाजी सरियाम (वय १८) यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत संतकुमार कोरी (वय २५, सध्या रा. नारंग ट्रान्सपोर्ट, उरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतकुमार आणि रामलोचन हे मामा-भाचे आहेत. रामलोचन, संतकुमार आणि धीरज हे मूळचे उत्तरप्रदेशातील असून, आरोपी हे मध्यप्रदेशातील आहेत.
उरळी कांचन परिसरातील गोदामात ते हमालीचे काम करतात. आरोपी आणि संतकुमार-रामलोचन यांच्यात एकमेकांकडे पाहण्यावरून वाद झाला होता. गुरुवारी (१० जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास रामलोचन हे बटाटा चिप्स आणण्यासाठी दुकानात गेले होते.
तेव्हा आरोपींपैकी एका व्यक्तीस त्यांचा धक्का लागला. या कारणावरून वाद उफाळून आला. वादानंतर आरोपींनी रामलोचन यांना दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपी संतकुमार राहत असलेल्या खोलीत शिरले.
आरोपींनी संतकुमार आणि धीरज यांनाही दांडक्याने बेदम मारहाण केली. मारहाणीत रामलोचन यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे आणि सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडे तपास करत आहेत.
