नान्नज येथे सेंद्रिय शेती कार्यशाळेत शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
सोलापूर : सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच उपक्रमांतर्गत 14 जुलै 2025 रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने मौजे नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात सेंद्रिय शेतीविषयक विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेसाठी नान्नज व परिसरातील सुमारे 250 ते 300 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. शेतकऱ्यांना कृषीभूषण पुरस्कार प्राप्त अंकुश पडवळे (मंगळवेढा) यांनी “जमिनीचे आरोग्य व विषमुक्त सेंद्रिय शेती” या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे (सोलापूर तालुका पोलीस ठाणे) यांनी केली. रोजगार हमी परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शहाजी पवार यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या वेळी कृषीभूषण पुरस्कार प्राप्त अंकुश पडवळे, दत्ता काळे आणि नागेश ननवरे यांचा पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे आणि अध्यक्ष शहाजी पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी संकल्पना राबवून योग्य नियोजन केले. यासाठी युथ संकल्प फाउंडेशन नान्नजचे संभाजी दडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या उपक्रमासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (अतिरिक्त कार्यभार) विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्यातील अंमलदारांनी विशेष परिश्रम घेतले.
