व्यावसायिकाकडील पैशांची बॅग चोरून नेली : बाबाजी पेट्रोलपंपासमोरील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : धाराशिव येथून व्यावसायिक कामासाठी आलेल्या व्यावसायिकाला मारहाण करून त्यांच्याकडील ४० लाख रुपयांची बॅग तिघा चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या चोरट्यांनी या व्यावसायिकाचा पाठलाग करून त्यांच्यावर नजर ठेवून अगदी शेवटच्या क्षणी त्यांच्याकडून पैशांची बॅग हिसकावून नेल्याचे दिसून येत आहे.
याबाबत अभिजित विष्णु पवार (वय ३२, रा. रामलिंगनगर, येडशी, ता. जि. धाराशिव) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी तिघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आंबेगाव येथील बाबाजी पेट्रोलपंपासमोर मंगळवारी सकाळी पावणे नऊ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित पवार हे व्यावसायिक आहेत. ते एका कामासाठी ४० लाख रुपये घेऊन आले होते. त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र मंगेश ढोणे हाही होता. बाबाजी पेट्रोलपंपासमोरील इमारतीमध्ये त्यांचे व्यावसायिक काम होते. त्यांनी त्यांची गाडी बाजूला लावली.
गाडीतून पैशांची बॅग घेऊन ते खाली उतरले. पैशांची बॅग मंगेश ढोणे याच्याकडे देऊन ते इमारतीकडे जाऊ लागले. त्याच वेळी एका कारमधून तिघे जण आले. त्यांनी मंगेश ढोणे याच्या खांद्यावरील पैशांची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यांना अभिजित पवार यांनी प्रतिकार केल्यावर त्यांना हाताने मारहाण करून ते तिघे चोरटे पळून गेले.
या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने व इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेतली.
या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरू केली असून पोलीस निरीक्षक गजानन चोरमले तपास करीत आहेत.
