साथीदारांच्या मदतीने व्यावसायिकाला लुटले : आंबेगाव पोलिसांनी उघडकीस आणला कट
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : भरदिवसात, गर्दीच्या मुख्य रस्त्यालगतच्या बोळात थार गाडीतून आलेल्या तिघांनी एका व्यावसायिकाला मारहाण करून त्याच्याकडील ४० लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग लुटून नेली. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली होती. आंबेगाव पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत ही चोरी पीडित व्यावसायिकाच्या मित्रानेच आखल्याचे उघड केले आहे.
आरोपी मंगेश दिलीप ढोणे (रा. रामलिंगनगर, येडशी, जि. धाराशिव) आणि प्रदीप रामदास डोईफोडे (रा. वरद हाइट्स, इंगळेनगर, भुगाव) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून थार गाडी, पाच मोबाईल आणि ९ लाख ३५ हजार ५०० रुपये रोख तसेच चार वेगवेगळ्या नंबर प्लेट्स जप्त करण्यात आल्या आहेत.
गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना मंगेश ढोणे यानेच प्रदीप डोईफोडे व इतर साथीदारांच्या मदतीने हा कट रचल्याचे निष्पन्न झाले. पीडित अभिजीत विष्णू पवार (रा. येडशी, जि. धाराशिव) यांचा ‘श्री गणेश ट्रेडर्स अँड पत्रा डेपो’ या नावाने पत्रा व स्टील साहित्य पुरवठ्याचा व्यवसाय आहे. १५ जुलै रोजी ते पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांकडून पैसे घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या बॅगेत ४० लाख रुपयांची रक्कम होती.
मंगेश ढोणे हा अभिजीत पवार यांचा मित्र असून, पवार यांनी पुण्यात येत असल्याची माहिती त्याला दिली होती. पुण्यात ते हडपसरमध्ये भेटले. अभिजीत पवार हे एक्सेला प्लाझा, आंबेगाव येथे बिलाच्या रकमेबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांनी गाडी रस्त्यावर लावून, रोख रक्कम असलेली बॅग मंगेश ढोणे याच्याकडे दिली.
मंगेश ढोणे बॅग खांद्यावर घेऊन मागोमाग चालत असताना थार गाडीतून दोन जण उतरले आणि त्यांनी त्याच्या खांद्यावरून बॅग हिसकावून घेतली. अभिजीत पवार यांनी गाडीच्या ड्रायव्हरकडे धाव घेऊन चावी काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच वेळी चालकाने त्यांच्या तोंडावर ठोसा मारल्याने ते खाली पडले. त्यानंतर आरोपी गाडीत बसून नवले पुलाच्या दिशेने पळाले.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने व गुप्त माहितीदारांच्या मदतीने प्रदीप डोईफोडे व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून थार गाडी जप्त करण्यात आली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी मंगेश ढोणे याची सखोल चौकशी केली असता, त्यानेही गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली.
पोलिस सध्या पळून गेलेल्या इतर तिघा आरोपींचा शोध घेत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त संजय बनसोडे, उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार, अजुम बागवान, शरद झिने, निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, सहाय्यक निरीक्षक अमोल रसाळ, अशिष कवठेकर, उपनिरीक्षक मोहन कळमकर, सहाय्यक फौजदार शैलेंद्र साठे तसेच पोलीस पथकाने केली.
