पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या डोळ्यात मारला मिरची स्प्रे : नशेत पोलीस ठाण्यात केली तोडफोड
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मोक्का गुन्ह्यात जामीन झाल्याने बाहेर आलेल्या सराईत गुंडाने, विनयभंगाच्या गुन्ह्यात पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला पकडून सहकारनगर पोलीस ठाण्यात आणले असता, नशेत धुंद असलेल्या या गुंडाने पोलीस ठाण्यात तोडफोड केली. हा सर्व प्रकार पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सहकारनगर पोलीस ठाण्यात घडला.
ऋषिकेश ऊर्फ बारक्या संजय लोंढे (वय २५, रा. तळजाई वसाहत) असे या आरोपीचे नाव आहे. लोंढे हा सराईत गुंड आहे. तळजाई परिसरात दहशत माजवून वाहनांची तोडफोड करणाऱ्या आणि नागरिकांना हत्याराचा धाक दाखवून लुटणाऱ्या मयूर आरडे व त्याच्या दहा साथीदारांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती.
त्यामध्ये ऋषिकेश ऊर्फ बारक्या लोंढे याचाही समावेश होता. जुलै २०२३ मध्ये ही कारवाई करण्यात आली होती. मोक्का प्रकरणात बारक्या लोंढे याला जामीन मिळाल्यामुळे तो सध्या बाहेर होता. बारक्या लोंढे हा एका विनयभंगासह आणखी एका गुन्ह्यात पोलिसांना हवा होता.
सहकारनगर पोलीस गुन्हेगार तपासत असताना ते त्याच्या तळजाई वसाहतीतील घरी पोहोचले. त्यावेळी तो घरातच सापडला. तो नशेमध्ये होता. पोलिसांनी त्याला पकडायला येत असल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसांच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे पोलिसांचे डोळे चुरचुरू लागले. असे असतानाही पोलिसांनी त्याला पकडून पहाटे साडेतीन वाजता सहकारनगर पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळी तो मोठमोठ्याने शिवीगाळ करत होता. त्याच्या हातात बेड्या घालण्यात आल्या होत्या.
शिवीगाळ करत तो पोलिसांना धमक्या देत होता. त्याने बेड्या घातलेल्या हाताने ठाणे अंमलदारांच्या जवळील काचेवर जोरात मारले, त्यामुळे ती काच फुटली. त्याच्या हातालाही काच लागली. ठाणे अंमलदारांच्या समोरील कॉम्प्युटरचीही त्याने तोडफोड केली. शेवटी पोलिसांनी त्याला आपला खाक्या दाखवत शांत केले.
