सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी : सराईत गुंडाकडूनही पिस्टल हस्तगत
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मारामारीचे गुन्हे असलेला अल्पवयीन मुलगा थेट गुन्हेगारी विश्वात पोहोचला. त्याने थेट मध्यप्रदेशातून तीन पिस्टल्स आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिंहगड रोड पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह तिघांकडून तीन पिस्टल्स तसेच सराईत गुंडाकडून एक अशा एकूण चार पिस्टल्स आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.
सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार विनायक मोहिते, राहुल ओलेकर आणि गणेश झगडे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सिंहगड रोड कॉलेजच्या क्रिकेट ग्राऊंडच्या बाजूला एक जण पिस्टल घेऊन थांबला आहे.
त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन शोध घेतला. एका अल्पवयीन मुलाकडून ४१ हजार रुपयांचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर रेकॉर्डवरील अल्पवयीन गुन्हेगाराकडून त्याने हे पिस्टल घेतल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्या अल्पवयीन गुन्हेगाराला ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याच्याकडे ही एक पिस्टल सापडले. त्याने सांगितले की, त्याने मध्यप्रदेशमधून तीन पिस्टल्स आणल्या होत्या. त्यातील एक पिस्टल धाराशिवमधील एका व्यक्तीला दिल्याचेही त्याने सांगितले.
पोलिसांनी धाराशिव येथे जाऊन अनिकेत महादेव सोनवणे (वय २६, रा. तुळजापूर, धाराशिव) याला अटक करून त्याच्याकडून ४० हजार रुपयांचे पिस्टल जप्त केले. या प्रकरणात पोलिसांनी एकूण १ लाख २१ हजार रुपयांचे तीन पिस्टल्स आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.
त्याचबरोबर, रेकॉर्डवरील आरोपी किरण विठ्ठल शिंदे (वय २३, रा. कृष्णकुंज अपार्टमेंट, वडगाव) यालाही अटक करून त्याच्याकडून एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमान यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे यांच्या सूचनेप्रमाणे, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारू, अण्णा केकाण, विकास बांदल, देवा चव्हाण, गणेश झगडे, विनायक मोहिते, राहुल ओलेकर, सागर शेडगे, निलेश भोरडे, तानाजी सागर, संदीप कांबळे, समीर माळवदकर आणि सतीश मोरे यांनी पार पाडली आहे.
