प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन : ‘सूर्यदत्त’मध्ये ‘नाईन अवर्स सायलेंट रीडॅथॉन २०२५’चे आयोजन
पुणे : पुण्यातील सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये ‘नाईन अवर्स सायलेंट रीडॅथॉन २०२५’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सलग नऊ तास मौन पाळून विद्यार्थ्यांनी वाचन, चिंतन आणि लेखन करून एकाग्रतेचा आणि सर्जनशीलतेचा अनोखा अनुभव घेतला.
बावधन येथील सूर्यदत्तच्या बन्सी-रत्न सभागृहात ‘मॅनेजिंग थ्रू इंडियन विस्डम’ या विषयावर आधारित ‘नाईन अवर्स सायलेंट रीडॅथॉन २०२५’ उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे नेतृत्व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी केले.
उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा आणि प्राचार्या डॉ. सिमी रेठरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली न्युरोफिजिओथेरपी विभागप्रमुख प्रा. डॉ. हर्षदा कुंभार यांनी या उपक्रमाचे संयोजन केले.
या अनोख्या संकल्पनेत २०० हून अधिक विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले. सर्वांनी मोबाईल व लॅपटॉपपासून दूर राहत शांततेत वाचन, लेखन, टिपण, काव्यरचना व अंतर्मुख चिंतन साधले. त्यांनी पाठ्यपुस्तके, स्व-सहाय्यता, व्यक्तिमत्त्व विकास, संशोधन प्रबंध व विविध शैक्षणिक स्रोतांचा अभ्यास केला.
या उपक्रमातून सखोल अभ्यास व जागरूक लेखनाची सवय पुन्हा रुजवण्याचा प्रयत्न झाला. मीनल गावंडे यांच्या योग व वॉर्मअप सत्रामुळे ऊर्जादायी वातावरण तयार झाले. विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी आपले अनुभव भावनिक शब्दांत मांडत मौन वाचनामुळे मिळालेली शांतता, सर्जनशीलता आणि नवकल्पनांची अनुभूती व्यक्त केली.
सततच्या स्क्रीन वापरामुळे होणारे मानसिक दुष्परिणाम यानिमित्ताने जाणवले, तर शांततेत अधिक आत्मचिंतन व एकाग्रतेचा अनुभव मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. हर्षदा कुंभार यांनी आभार मानले, तर डॉ. सिमी रेठरेकर यांनी आशावादी प्रार्थनेने समारोप केला.
या उपक्रमामुळे सूर्यदत्त फिजिओथेरपी कॉलेज ‘इंडियन स्टार वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये सलग नऊ तास मौन वाचन करणारे पहिले कॉलेज ठरण्याचा मान मिळवत आहे. सूर्यदत्त संस्थेचा नेहमीच प्रयत्न असतो की विद्यार्थ्यांना केवळ अकादमिक शिक्षण नव्हे, तर सर्वांगीण विकास, कौशल्याभिमुख आणि जागतिक स्तरावर योगदान देणारे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी पोषक वातावरण मिळावे. मौन, वाचन आणि चिंतन विद्यार्थ्यांना मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि ज्ञान संपन्नतेकडे घेऊन जाते. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
