विवाहितेच्या छळाच्या गुन्ह्यात दोषारोपपत्रात त्रुटी ठेवण्यासाठी मागितली होती लाच
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : विवाहितेचा छळ केल्याचा गुन्हा तपासण्यासाठी महिला पोलीस हवालदाराकडे देण्यात आला होता. पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याऐवजी, दोषारोपपत्रात मुद्दाम त्रुटी ठेवून तिच्या पतीला फायदा मिळावा यासाठी लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा कारवाईत महिला पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस फौजदार लाच घेताना अडकले.
लाच घेतल्याप्रकरणी पोलीस हवालदार राजश्री रवी घोडे आणि सहायक पोलीस फौजदार राकेश शांताराम पालांडे यांना अटक करण्यात आली आहे. दोघांची नेमणूक रावेत पोलीस ठाण्यात आहे. तक्रारदार हे वकील असून, त्यांच्या अशिलाविरुद्ध रावेत पोलीस ठाण्यात विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास राजश्री घोडे यांच्याकडे देण्यात आला होता.
आरोपीला अटक होऊ नये, तसेच दोषारोपपत्रात मुद्दाम त्रुटी ठेवून आरोपीस फायदा व्हावा यासाठी राजश्री घोडे यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.या तक्रारीनंतर तक्रारदाराने १७ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
त्यानुसार, चौकशीत घोडे यांनी सुरुवातीला ५० हजारांची मागणी केली होती. तडजोडीनंतर त्या ३० हजार रुपयांवर तयार झाल्या. राकेश पालांडे यांनी या लाच मागणीस प्रोत्साहन दिले असल्याचेही निष्पन्न झाले.
१८ जुलै रोजी रावेत पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. त्यावेळी तक्रारदाराकडून ३० हजारांची लाच घेताना राजश्री घोडे यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर राकेश पालांडे यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले.
या दोघांविरुद्ध रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सतिश वाळके यांच्या पथकाने केली.
