सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी सादर केली कल्पकता आणि आत्मविश्वासाची झलक
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (SIFT) यांच्या वतीने १३व्या वार्षिक फॅशन शो ‘ला क्लासे २०२५’चे आयोजन सूर्यदत्तच्या बावधन कॅम्पस येथे उत्साहात करण्यात आले.
‘फ्युजन ऑफ कल्चर्स’ या संकल्पनेवर आधारित या भव्य फॅशन शोमध्ये विद्यार्थ्यांनी डिझाइन केलेले अनोखे पोशाख, मनमोहक रॅम्प वॉकसह सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या फॅशन शोमध्ये सूर्यदत्तच्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी मॉडेलिंग करत आत्मविश्वासाने आपली कला, शैली आणि सर्जनशीलता सादर केली.
विशेष म्हणजे या शोमधील सर्व पोशाखांचे डिझाइन्स SIFT च्या विद्यार्थ्यांनी स्वतः डिझाइन केले होते. लहान मुलांनी देखील रॅम्प वॉकमध्ये सहभाग घेत, प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. कार्यक्रमाचे उद्घाटन सूर्यदत्तचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सौ. सुषमा चोरडिया, सह-उपाध्यक्षा सौ. स्नेहल नवलखा, ज्युरी सदस्य एस. एन. अंजली, मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल, महासंचालक डॉ. एस. रामचंद्रन, प्राचार्या डॉ. सायली पांडे व विभागप्रमुख पूजा विश्वकर्मा यांच्या उपस्थितीत झाले.
या प्रसंगी प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना वाव देणारा आणि सामाजिकता जपत साजरा होणारा ‘ला क्लासे’ फॅशन शो म्हणजे एक प्रेरणादायी उपक्रम आहे. तो केवळ डिझाइन नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्जनशील अभिव्यक्तीचा एक सुंदर अविष्कार आहे.”
कार्यक्रमाला सूर्यदत्तच्या सर्व शाखांचे प्राध्यापक, विविध क्षेत्रातील मान्यवर, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘ला क्लासे’ शोमधून विद्यार्थ्यांनी केवळ रॅम्पवरच नव्हे, तर व्यावसायिक क्षेत्रातही पदार्पणाची तयारी सुरू असल्याचे भासवले.
