साध्या वेशातील पुणेकरांनी पाठविलेल्या फोटोवरुन ३ हजारांवर दंडाची कारवाई : १६ लाख ५० हजारांचा दंड
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : अनेकदा वाहतूक पोलीस नसल्याचे पाहून अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसतात. पण, आता वाहतूक पोलीस दिसला नाही तरी जागरुक पुणेकरांच्या माध्यमातून हा साध्या वेशातील पोलीस रस्त्यावर असणार आहे. तेव्हा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर वाहतूक पोलिसांनी एक इशारा दिला आहे.
वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीमध्ये पुणेकरांच्या सहभाग घेण्यासाठी पीटीपी ट्रॉफिक कॉप अॅपची निर्मिती पुणे पोलिसांनी केली आहे. या अॅपवर वाहतूक नियमांचे भंग करणार्या ४ हजारांहून अधिक फोटो पोलिसांना दीड महिन्यात प्राप्त झाले.
त्यातील ३ हजार १०१ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर १६ लाख ५० हजार रुपयांची दांडात्मक कारवाई करण्यात आल्याचे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.
सुजाण नागरिक हेही खासगी वेशातील पोलीसच आहेत.
त्यांना सुद्धा वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठीचे काम करता येऊ शकते, यासाठी पुणे पोलीस व नियमांचे पालन करणार्या (ज्यांचे वाहनांवर एकही वाहतूक नियमभंगाचे चलन प्रलंबित नाही) अशा सुज्ञ पुणेकरांसाठी पुणे पोलीस ट्रॉफिक अॅप नितीन काणे आणि नितीन वैद्या यांच्याकडून अॅप तयार करुन घेण्यात आले.
या अॅपचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १४ जून २०२५ रोजी करण्यात आले होते. या अॅपमध्ये नागरिकांना काही सुविधा देण्यात आल्या. त्यात फुटपाथवर वाहन पार्किंग करणे, फुटपाथवरुन वाहन चालविणे, रेड झोनमध्ये जड वाहनांचे निर्बधांचा भंग करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, ट्रिपल सिट वाहन चालविणे, काळ्या फ्लिमचा वापर, फॅन्सी नंबर प्लेट, विरुद्ध दिशेने/नो एंट्रीतून वाहन चालविणे अशा प्रकारचे धोकादायक नियमभंग करणार्या वाहन चालकांचे फोटो नागरिक या अॅपवर अपलोड करु शकतील, या व्यतिरिक्त वाहतूक कोंडीस कारणीभूत असणार्या अपघात, वाहनात बिघाड, रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडी, रस्त्यावर तेल गळती, रस्त्यावर पाणी साचणे, रस्त्यावर झाड पडणे, रस्त्यात बेवारस असणारे वाहन इत्यादी माहिती नागरिक या अॅपद्वारे वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षास कळवू शकतात़, असे आवाहन करण्यात आले होते.
पीपीटी अॅप च्या माध्यमातून प्राप्त होणार्या तक्रारीची पुढील ४८ तासांमध्ये पडताळणी करुन वाहतूक पोलीस नियमभंग करणारे वाहन चालकांवर चलन जनरेट करतील, असे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.
