पेट्रोलपंपासाठी जागेचा बिगर शेतीचा दाखला देण्यासाठी मागितली ४ लाखांची लाच
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पेट्रोलपंपाची डीलरशिप मिळाल्याने त्याच्या जागेसाठी बिगर शेती परवाना व बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी ४ लाख रुपयांची लाच मागून साडेतीन लाखांची लाच स्वीकारण्यास मान्यता दिलेल्या दौंड नगरपरिषदेच्या नगररचना सहायकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
विजयकुमार मधुकर हावशेट्टे (वय ३१) असे या नगररचना सहायकाचे नाव आहे. याबाबत एका ३६ वर्षीय नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदारांनी बीपीसीएल कंपनीकडे पेट्रोलपंप डीलरशिपसाठी अर्ज केला होता.
पेट्रोलपंप उभारणीसाठी आवश्यक असलेली जागा त्यांनी लालचंद लुंड यांच्याकडून २० वर्षांच्या भाडेकराराने घेतली आहे. या जागेवर पेट्रोलपंप उभारणीसाठी दौंड नगरपरिषदेचा बिगर शेती दाखला व बांधकाम परवाना आवश्यक असल्याने लुंड यांनी अर्ज केला होता. लुंड हे (वय ७३) वयोवृद्ध असल्यामुळे तक्रारदार हे काम पाहत होते.
३ जानेवारी २०२५ रोजी दौंड नगरपरिषदेचे नगररचना सहाय्यक विजयकुमार हावशेट्टे यांनी जागेवर जाऊन समक्ष पाहणी केली. पेट्रोलपंपासाठी आवश्यक असणारा सर्वे अहवाल तसेच टेन्टेटिव्ह लेआउट, फायनल लेआउट आणि बांधकाम परवाना देण्यासाठी तक्रारदारांकडे २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
१० जानेवारी २०२५ रोजी तक्रार दाखल केल्यानंतर, त्यानुसार १४ जानेवारी रोजी पडताळणी करण्यात आली. त्यावेळी ही सर्व मंजुरी करून देण्यासाठी स्वत:साठी व दौंड नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी विजय कावळे यांच्यासाठी सुरुवातीला ४ लाख रुपयांची लाच मागितली.
तडजोडीनंतर ३ लाख ५० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्यास मान्यता दिली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक रुपेश जाधव तपास करत आहेत.
