स्वारगेट पोलिसांची कामगिरी : दोन दुचाकी जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मित्र मंडळ परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. मार्केटयार्ड भागातून त्याने आणखी एक दुचाकी चोरल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.
राज परमेश्वर कदम (वय २६, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यातील तपास पथक २३ जुलै रोजी पेट्रोलिंग करत असताना मित्र मंडळ चौकाजवळील पीके बिर्याणी हॉटेलसमोरून जात होते. यावेळी एक दुचाकीस्वार उलट दिशेने येत होता.
संशय आल्याने त्यांनी त्याला थांबवून चौकशी केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या जवळील दुचाकीची तपासणी केली असता, तीच दुचाकी मित्र मंडळ परिसरातून चोरीला गेल्याची नोंद स्वारगेट पोलीस ठाण्यात होती.
पोलिसांनी राज कदम याला अटक केली. चार ते पाच दिवसांपूर्वी त्याने मित्र मंडळ चौकाजवळून ही दुचाकी चोरल्याचे स्पष्ट झाले. पुढील चौकशीत त्याने मार्केटयार्ड भागातून १० दिवसांपूर्वी आणखी एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
या प्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातही वाहन चोरीचा गुन्हा दाखल आहे.त्याच्याकडून ५० हजार रुपये किंमतीच्या एक पॅशन आणि एक ॲक्टीवा गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विकास भारमळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, पोलीस कर्मचारी अश्रुबा मोराळे, हर्षल शिंदे, हनुमंत दुधे, फिरोज शेख, सुजय पवार, रमेश चव्हाण, दीपक खेंदाड यांनी केली आहे.















