खडकीत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : समाजात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सुशिक्षित बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्यासाठी शहरातील महाविद्यालये आणि विविध आस्थापनांमध्ये मुलाखत तंत्र प्रणाली प्रभावीपणे राबवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कृष्णकुमार गोयल यांनी केले.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे आणि टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले. त्यावेळी ते मार्गदर्शन करत होते. या भव्य मेळाव्यात पुणे शहर व परिसरातील ३९७ युवक-युवतींनी नोकरीसाठी नोंदणी केली.
त्यापैकी १४९ उमेदवारांची विविध कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली. कार्यक्रमाच्या प्रमुख वेळी मंचावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य राजेंद्र लेले, प्राचार्य सहसचिव डॉ. संजय चाकणे, जिल्हा कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर मोहिते, संचालक ॲड. अजय सूर्यवंशी, कृष्णकुमार गोयल, संस्थेचे चिटणीस आनंद छाजेड, उपायुक्त अ. ऊ. पवार, रमेश अवस्थी, मधुकर टिळेकर, मुरकुटे, उपप्राचार्या सुचेता डळवी, प्रा. ज्योती वाघमारे आणि खडकी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
महाविद्यालयातील उपक्रमांबाबत माहिती देताना प्राचार्य सहसचिव डॉ. संजय चाकणे म्हणाले, “खडकी शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच कार्यरत असते. भविष्यात अशा रोजगारमूल्यवर्धक उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येईल.”
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या उपायुक्त अ.ऊ. पवार यांनी रोजगार मेळाव्याचे उद्दिष्ट व महत्त्व समजावून सांगितले. तर संस्थेचे सचिव आनंद छाजेड यांनी भविष्यात उपलब्ध होणाऱ्या विविध रोजगार संधींबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शितल रणधीर यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक आयुक्त सा. बा. मोहिते यांनी केले. या रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन डॉ. शितल रणधीर यांच्या नेतृत्वाखालील नियोजन समितीने कौशल्यपूर्वक पार पाडले.
