“नशामुक्त समाज म्हणजे प्रगतीशील राष्ट्र” – प्रा. डॉ. संजय चोरडिया
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनाच्या निमित्ताने सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या विविध संस्थांमध्ये व्यसनमुक्तीविषयक जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ‘नशा मुक्त भारत अभियान’अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये नशेचे दुष्परिणाम व त्यावरील प्रतिबंध याविषयी सजगता निर्माण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन झाले. हा उपक्रम संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात सूर्यदत्त नॅशनल स्कूल, सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस, कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेज आणि सूर्यदत्त पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नशामुक्त भारतासाठी काढलेल्या पदयात्रेने झाली.
‘Say No to Dope, Yes to Hope’ अशा घोषवाक्यांसह विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त जीवनशैलीचा संदेश दिला. या पदयात्रेला सूर्यदत्तच्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा आणि हेल्थ सायन्सेसच्या प्राचार्या डॉ. सिमी रेठरेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला.
संस्थेच्या बावधन कॅम्पसमधील बन्सीरत्न सभागृहात झालेल्या कार्यक्रमात बावधन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत जाधव, पोलीस कर्मचारी सुभाष बहिरट, सुरज टिळेकर आणि कावेरी बांगर आदी उपस्थित होते. याप्रसंगी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सूर्यदत्त स्कार्फ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन नीलिमा मगरे यांनी केले.
कार्यक्रमात अंमली पदार्थांचे सेवन केल्याने होणाऱ्या परिणामांवर आधारित लघुपटांचे प्रेक्षण करण्यात आले. त्यानंतर डॉ. अशोक डोंगरे यांनी उपस्थितांना चांगल्या आरोग्याचे महत्त्व पटवून देत व्यसनांपासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी शंका समाधानही केले.
यावेळी सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. किरण राव यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थविरोधी शपथ दिली आणि व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आवाहन केले. आभारप्रदर्शन नीलिमा मगरे यांनी केले.
“विद्यार्थ्यांचे व समाजाचे आरोग्य टिकवण्यासाठी अशा जनजागृती उपक्रमांना आम्ही नेहमीच प्रोत्साहन देतो. नशामुक्त समाज म्हणजे प्रगतीशील समाज. प्रत्येकाने जर व्यसनांपासून दूर राहण्याचा निर्धार केला, तर आपला देश शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होऊन दुप्पट वेगाने प्रगती करू शकतो.” – प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया
