महिलेची जागा बळकाविण्याचा प्रयत्न : गुन्हे शाखेच्या युनिट ५ ची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कोंढवा येथील महिलेची जागा बळकावणाऱ्या सराईत गुन्हेगार टिपू पठाण याच्या टोळीतील फरारी गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने तेलंगणातील हैद्राबाद येथून जेरबंद केले आहे. तो गेल्या ३ महिन्यांपासून फरार होता.
फैयाज गफार बागवान (वय २८, रा. खाजा मंजिल गल्ली, सय्यदनगर, हडपसर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. मासे विक्री करणाऱ्या महिलेच्या हडपसर येथील १२९० स्क्वेअर फूट मोकळ्या प्लॉटवर टिपू पठाण आणि त्याचा भाऊ इजाज पठाण यांनी बेकायदेशीर जमाव जमवून ताबा घेतला होता.
महिलेने या जागेवर उभारलेले शेड पाडून, टिपू पठाण याने ती जागा आपल्या भावाची असल्याचे सांगत बोर्डावरील तिचे नाव खोडून त्यावर भावाचे नाव लावले होते. ही जागा परत हवी असेल तर २० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.
काळेपडळ पोलिसांनी टिपू पठाण, त्याचा भाऊ इजाज पठाण यांच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. टोळीतील इतर गुन्हेगारांची नावे निष्पन्न केली आहेत. पोलिसांनी या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई केली आहे.
या फरारी आरोपीचा शोध गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे अधिकारी घेत होते. पोलीस अंमलदार नासेर देशमुख व राहुल ढमढेरे यांना फैयाज बागवान हा आरोपी हैद्राबाद येथील हाफीस पेठमधील प्रेमनगरमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने मियापूर पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या मदतीने फैयाज बागवान याला ताब्यात घेतले.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खरात, पोलीस अंमलदार नासेर देशमुख, शहाजी काळे, राहुल ढमढेरे यांनी केली आहे.
