एकाच ठिकाणी दुसऱ्यांदा चोरी करण्याचा प्रयत्न आला अंगाशी : लष्कर पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : लष्कर, कोंढवा परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह लष्कर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. एकाच ठिकाणी दुसऱ्यांदा चोरी करण्याचा चोरट्याचा प्रयत्न अंगाशी आला. यापूर्वी केलेल्या घरफोडीत साडेपाच लाख रुपयांची रोकड मिळाल्यामुळे चोरट्याने कॅम्पमधील त्याच कार्यालयात पुन्हा चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी त्याला तेथे काहीच हाती लागले नाही. तेथील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस या चोरट्यांपर्यंत पोहोचले.
आर्यन अजय माने ऊर्फ मॉन्टी (वय २१, रा. खुटवड चौक, हरपळे वस्ती, फुरसुंगी), विशाल मारुती आचार्य (वय २५, रा. आनंदनगर, रामटेकडी), ओमकार सुरेश गोसावी (वय २२, रा. मुक्ताई रेसिडेन्सी, फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आर्यन माने आणि ओमकार गोसावी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर हडपसर, वानवडी, लोणीकंद पोलीस ठाण्यांत अनेक चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
जन थिम्मय्या रोडवरील ‘राजीव पटेल अॅन्ड असोसिएट्स’ या कार्यालयाच्या मागील बाजूच्या स्लायडिंग विंडोमधून चोरटा आत शिरला व त्याने कार्यालयातील टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले साडेपाच लाख रुपये चोरून नेले होते. हा प्रकार ३१ मार्च रोजी सकाळी उघडकीस आला होता. लष्कर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर, याच कार्यालयात १५ जुलै रोजी पुन्हा घरफोडी करण्याचा प्रयत्न झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा बाहेरील भिंतीवरून चढून आत आला, खिडकी उघडून कार्यालयात शिरला. त्याने सर्व टेबलांचे ड्रॉवर, कपाटे उघडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. कार्यालयातील छोटीशी तिजोरी खिडकीत उचलून ठेवलेली दिसली. मागील चोरीपासून दक्षता घेऊन त्यांनी यावेळी कार्यालयात पैसे ठेवले नव्हते.
त्यांच्या शेजारील युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेच्या खिडकीची ग्रील वाकवून चोरटा आत शिरला होता. आतमध्ये शोधाशोध करून त्याने दुसऱ्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी त्याच्या हाताला काहीही लागले नाही.
तपासादरम्यान लष्कर पोलिसांना या गुन्ह्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा मागोवा घेत फुरसुंगीपर्यंतचे फुटेज तपासले. त्यातून चोरट्याच्या गाडीचा क्रमांक मिळाला. त्यानंतर तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी रामटेकडी, हडपसर, फुरसुंगी परिसरात वाहनांचा व आरोपींचा शोध घेतला. बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रामटेकडी परिसरात येत असताना पोलिसांनी सापळा रचून तिघांना पकडले.
तपासात त्यांनी कोंढवा, लष्कर परिसरात घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. कॅम्पमधील वकिलाच्या कार्यालयात मार्चमध्ये झालेली घरफोडीही याच टोळीने केल्याचे निष्पन्न झाले. तसेच, कोंढव्यात काकडे वस्तीतील एका दुकानात घरफोडी करून त्यांनी ९० हजार रुपयांची रोकड चोरून नेली होती. या दोन्ही गुन्ह्यांतील ऐवज हस्तगत करण्यात येत आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवघिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल दांडगे, पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे, पोलीस अंमलदार महेश कदम, अतुल मेगे, सोमनाथ बनसोडे, रमेश चौधर, प्रविण गायकवाड, प्रमोद गायकवाड, अमोल चव्हाण, लोकेश कदम, सागर हराळ, अमोल कोडीलकर यांनी केली आहे.















