टिळेकर चौक ते आईमाता मंदिर हाईट बॅरिअरपर्यंत रात्री जड वाहनांना मुभा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गंगाधाम चौक परिसरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने यापूर्वी जड आणि अवजड वाहनांवर बंदी घातली होती. मात्र, या निर्णयात अंशतः बदल करण्यात आला असून, काही वेळेसाठी जड वाहनांना मार्गमुक्ती देण्यात आली आहे.
वाहतूक शाखेने दिलेल्या नव्या आदेशानुसार, टिळेकर चौक ते आईमाता मंदिर हाईट बॅरिअर या दरम्यान रात्री १० ते सकाळी ८ या वेळेत ट्रक, मिक्सर, डंपर, कंटेनर व अन्य सर्व जड/अवजड वाहनांना दोन्ही दिशेने वाहतुकीस मुभा देण्यात आली आहे. मात्र, आईमाता मंदिर हाईट बॅरिअर ते गंगाधाम चौक या रस्त्यावर २४ तास जड/अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद असणार आहे.
याशिवाय, लुल्लानगर कोंढवा – गंगाधाम चौक – चंद्रलोक हॉस्पिटल चौक व गंगाधाम चौक – वखार महामंडळ चौक – सेव्हन लव्हज चौक या मार्गांवर सकाळी ८ ते रात्री १० वाजेदरम्यान ट्रक, मिक्सर, डंपर, कंटेनर व अन्य अवजड वाहनांना ये-जा करण्यास बंदी असणार आहे.
तसेच, वखार महामंडळ चौक ते मार्केट यार्ड गेट क्र. ९ दरम्यान रात्री आलेल्या मालवाहू वाहनांना दिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खासगी रस्त्यांवरून माल उतरवण्यासाठी वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. हा आदेश पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी जारी केला आहे.
