बँकॉक ते पुणे अंमली पदार्थ तस्करीचा नवा राजमार्ग; ‘ड्रग्ज फ्री पुणे’ मोहिमेला नवे आव्हान
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बँकॉकहून लोहगाव विमानतळावर आलेल्या भारतीय प्रवाशाकडून सीमा शुल्क विभागाने साडे दहा कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. बँकॉकहून सातत्याने होत असलेल्या या तस्करीमुळे पुणे पोलिसांच्या ‘ड्रग्ज फ्री पुणे’ मोहिमेला नवे आव्हान निर्माण झाले आहे.
अभिनय अमरनाथ यादव असे या प्रवाशाचे नाव आहे. यादव हा मूळचा उत्तर भारतातील असून तो बँकॉकहून २४ जुलै रोजी थेट पुण्यात आला. इंडिगो विमानातून आलेल्या प्रवाशाच्या हालचाली सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांना संशयास्पद वाटल्या.
पोलिसांनी त्याला अडवून चौकशी केली. तेव्हा त्याच्या सामानामध्ये १०.४७ किलोग्रॅम हायड्रोपोनिक वीड (मारिजुआना) आढळून आला. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात साडे दहा कोटी रुपये इतकी किंमत आहे.
सीमा शुल्क विभागाने त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. हायड्रोपोनिक गांजा हा अत्यंत महागडा समजला जातो. तो शीतगृहात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नियंत्रित वातावरणात वाढविण्यात येतो.
पुणे हे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ वाहतूकीचे केंद्र अनेक वर्षांपासून आहे. पोलिसांच्या सातत्याने होत असलेल्या कारवायांमुळे परदेशातून होणाऱ्या तस्करीमध्ये घट झाली होती. मात्र, आता बँकॉकहून येणाऱ्या या हायड्रोपोनिक गांजामुळे ही आंतरराष्ट्रीय तस्करी पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे.
बँकॉक ते पुणे हा अंमली पदार्थांच्या तस्करीचा एक नवा मार्ग झाल्याचे उघड होत आहे. गेल्या काही दिवसांत सीमा शुल्क विभागाने हायड्रोपोनिक गांजा पकडण्याची ही तिसरी वेळ आहे. पुणे पोलिसांच्या ‘ड्रग्ज फ्री पुणे’ या मोहिमेला त्यामुळे एक नवे आव्हान निर्माण झाले आहे.















