फसवणुकीसाठी सायबर चोरट्यांना बँक खाते केले होते उपलब्ध : पिंपरी सायबर पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : भारतातील नागरिकांना शेअर बाजारातील गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या परदेशातील सायबर चोरट्यांशी संगनमत करून त्यांना येथील बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्यांचे प्रकार यापूर्वी समोर आले होते. आता चिनी सायबर चोरट्यांना डेक्कन जिमखाना सारख्या प्रतिष्ठित भागात राहणारा एक चित्रपट निर्माता मदत करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने एरंडवणे येथील या चित्रपट निर्मात्यास अटक केली आहे. सायबर फसवणुकीतून त्याच्या बँक खात्यात तब्बल ८६ लाख रुपये जमा झाल्याचे समोर आले आहे. सायबर फसवणुकीच्या एकूण १५ गुन्ह्यांमध्ये या बँक खात्याचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
शिवम बाळकृष्ण संवत्सरकार (वय ३३, रा. एरंडवणे, पुणे) असे या अटकेतील व्यक्तीचे नाव आहे. तो स्वत:ला चित्रपट निर्माता असल्याचे सांगतो. मात्र, तपासादरम्यान त्याने चिनी नागरिक बाम्बिनी याच्याशी संपर्कात राहून बँक खात्याचा गैरवापर केल्याचे उघड झाले आहे.
फिर्यादी युट्युब पाहत असताना त्यांना शेअर बाजाराशी संबंधित एक व्हिडिओ दिसला. त्याखाली दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरच्या लिंकवरून त्यांनी संपर्क साधला. त्यानंतर गुंतवणुकीचे मार्गदर्शन देत चांगला परतावा मिळेल असे सांगण्यात आले. त्यांना एका अॅपवर नोंदणी करायला सांगण्यात आले आणि त्यातून ५७,०७० रुपयांची फसवणूक करण्यात आली.
या रकमेपैकी काही रक्कम आयडीएफसी बँकेच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली होती. तपासात हे खाते ‘बालाजी इंटरप्रायझेस’ या नावाने नोंदवलेले असून, ते शिवम संवत्सरकार याचे असल्याचे स्पष्ट झाले.
प्राथमिक चौकशीत शिवमने आपण चित्रपट निर्माता असल्याने असे काही करणे शक्य नाही, असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी यांच्या तपासात त्याने चिनी गुन्हेगार बाम्बिनीच्या संगनमताने फसवणुकीस मदत केल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणात वापरण्यात आलेल्या बँक खात्यावर एकूण ८६ लाख ४३ हजार ११९ रुपये ट्रान्सफर झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच खात्याविरोधात एकूण १५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याच्या मोबाईलची तपासणी केल्यावर आणखी दोन बँक खाती काढल्याचे आणि सायबर गुन्ह्याच्या उद्देशाने ती वापरण्याचा हेतू असल्याचे आढळून आले.
वेळेवर अटक केल्यामुळे इतर अनेक नागरिकांची फसवणूक होण्यापासून पोलिसांनी वाचवले आहे. त्याच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस अंमलदार दीपक भोसले, विनायक म्हसकर, सुरज शिंदे, अभिजित उकिरडे, प्रविण शेळकंदे, नितेश बिचेवार, अतुल लोखंडे, माधव आरोटे, शिवाजी बनसोडे, सोपान बोधवड, दिपाली चव्हाण, वैशाली बर्गे, भाविका प्रधान यांनी सहभाग घेतला.















