हातउसने, कर्ज काढून जमवलेले पैसे मनी ट्रान्सफर व्यवसायिकाने गमावले
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : ट्रेड प्राफिट फंडात रोख स्वरूपात गुंतवणूक केल्यास तुम्हाला ऑनलाईन आरटीजीएसद्वारे पैसे परत मिळतील, त्याबरोबरच १० टक्के कमिशन मिळेल, अशा झटपट मिळणाऱ्या मोठ्या कमिशनच्या आमिषाला बळी पडून मनी ट्रान्सफरचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाने मित्र, नातेवाईक यांच्याकडून व कर्ज काढून ७० लाख रुपये जमवले. मात्र त्याला कमिशन तर मिळालेच नाही, उलट गुंतवलेले ७० लाख रुपयेही गमावले. आता लोकांकडून घेतलेले पैसे फेडण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.
याबाबत योगेश शिवाजी रासकर (वय ३२, रा. खडकआळी, माळेगाव, ता. बारामती) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बंडगार्डन रोडवरील कॅनॉट प्लेस येथील मोहनलाल व अंबालाल कंपनीत ११ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता घडला.
याआधीही शुक्रवार पेठेतील भारत भवन येथील आंगडियाच्या कार्यालयात एका व्यापाऱ्याची २ कोटी रुपयांची फसवणूक झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मनी ट्रान्सफरचा व्यवसाय आहे.
या व्यवसायामुळे त्यांची अनेक ठिकाणी ओळख झाली. अशाच ओळखीमधून सुयोगराज वेल्हाळ यांच्याद्वारे त्यांची ओळख विपुल मुळे याच्याशी झाली. मुळे याने त्यांना सांगितले की, “ट्रेड प्राफिट फंडात रोख पैसे गुंतवले, तर ऑनलाईन आरटीजीएसद्वारे ते परत मिळतात, शिवाय गुंतवणुकीवर १० टक्के कमिशनही मिळते. यासाठी १ कोटी रुपये गुंतवावे लागतील.”
रासकर यांनी आपल्याकडे १ कोटी रुपये नसल्याचे सांगितल्यावर त्यांनी मावसभाऊ, नातेवाईक व मित्रांकडून हातउसने पैसे घेतले. दोन पतसंस्थांतून १५ लाखांचे कर्ज आणि होम लोनद्वारे १६ लाख रुपये घेतले.
सर्व मिळून त्यांनी ७० लाख रुपये गोळा केले. मित्राच्या सांगण्यावरून हे पैसे घेऊन ते कॅनॉट प्लेस येथील मोहनलाल व अंबालाल कंपनीत गेले. तेथे त्यांनी दोघांकडे पैसे असलेली बॅग दिली. त्या दोघांनी सांगितले की, “हे पैसे कंपनीच्या पॉलिसीनुसार गोडावनला घेऊन जाऊन तेथे मोजावे लागतील. त्यानंतर लवकरच तुमचे पैसे आणि कमिशन मिळतील.”
मात्र बराच वेळ गेल्यानंतरही ते परत आले नाहीत. त्यानंतर रासकर यांनी आपल्या मित्राला फोन केला. त्याने सांगितले, “मी त्यांना संपर्क करतो,” पण त्यांचा मोबाईल बंद लागत होता. नंतर तो मित्र तेथे आला.
त्यांनी मिळून त्या दोघांचा शोध घेतला, पण ते सापडले नाहीत. बराच काळ त्यांची वाट पाहिल्यानंतर अखेर रासकर यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे करत आहेत.
