डॉ. मुकूल घरोटे यांचे संशोधन : किशोरवयीन रुग्णांना मिळाले जीवनदान
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
नाशिक : वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक व अभिनव मेमॅट या उपचारपद्धतीच्या माध्यमातून मेडुलो ब्लास्टॉमा या दुर्मिळ व गंभीर मेंदूच्या कर्करोगावर यशस्वी उपचार करून किशोरवयीन रुग्णांना जीवनदान देण्यात नाशिकमधील नामको हॉस्पिटलचे कॅन्सर तज्ज्ञ डॉ. मुकूल घरोटे यांनी ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या अभिनव संशोधन पद्धतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, जगभरातील अशा रुग्णांसाठी ही उपचार पद्धती पथदर्शी ठरत आहे.
नाशिक शहर व ग्रामीण भागातील दोन किशोरवयीन रुग्णांना मेंदूच्या कर्करोगाचे निदान झाले होते. प्रखर डोकेदुखी, दुहेरी प्रतिमा दिसणे, सतत मळमळ होणे अशी तीव्र लक्षणे दिसत होती. तातडीने उपचार आवश्यक असतानाच, रुग्णांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक होती. विविध रुग्णालयांत उपचाराचा प्रयत्न करूनही निष्फळ ठरल्यानंतर ते शेवटी नामको हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.
रुग्णांच्या परिस्थितीचा विचार करून डॉ. घरोटे यांनी हॉस्पिटलच्या विश्वस्त मंडळाशी चर्चा केली. त्यानंतर मंडळाने रुग्णांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला. विविध संस्थांच्या आर्थिक मदतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
पारंपरिक उपचार पद्धतीत प्रचंड वेदना व मोठा आर्थिक खर्च अपेक्षित असतो. तसेच किशोरवयीन रुग्णांसाठी त्याचे दुष्परिणाम गंभीर ठरू शकतात. याचा विचार करून डॉ. घरोटे यांनी स्वतःच्या संशोधनातून विकसित केलेली मेमॅट पद्धती अवलंबली.
या पद्धतीत बाधित कर्करोगी पेशींवर टार्गेटेड थेरपीद्वारे लक्ष केंद्रित केले जाते. ठराविक कालावधीत विशेष औषधांच्या गोळ्या देऊन कर्करोगी पेशींना होणारा रक्तपुरवठा थांबवला जातो. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या कर्करोगी पेशींचा नाश करण्यासाठी बोन मॅरो प्रत्यारोपण करण्यात आले.
उपचारानंतर केलेल्या पेट-स्कॅनमध्ये दोन्ही रुग्ण कर्करोगमुक्त झाल्याचे स्पष्ट झाले. या मोहिमेत डॉ. मुकूल घरोटे यांच्यासोबत बोन मॅरो प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. सिद्धेश कलंत्री, कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. निलेश वासेकर आणि औषधोपचार तज्ज्ञ डॉ. अनुष्का देवगावकर यांनी मोलाची भूमिका बजावली.
मानवी शरीरात पेशींची निर्मिती व नाशाची प्रक्रिया नैसर्गिकरीत्या चालू असते. परंतु काही पेशी आपले आयुष्य वाढवण्यासाठी स्वतःसारख्या पेशींची झपाट्याने निर्मिती करू लागतात, तेव्हा त्या कर्करोगी पेशी बनतात. मेडुलो ब्लास्टॉमामध्ये अशा पेशी जास्त रक्तपुरवठ्यासाठी नवीन रक्तवाहिन्या (निओ-एंजिओजेनेसिस) तयार करतात.
डॉ. घरोटे यांनी या प्रक्रियेचा सखोल अभ्यास करून अशा औषधांचा वापर केला, ज्यामुळे नव्या रक्तवाहिन्यांची निर्मिती थांबविण्यात आली आणि कर्करोगी पेशींचा नाश झाला.
एकाचवेळी दोन रुग्णांवर केलेल्या या यशस्वी उपचाराची दखल आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नल्सने घेतली आहे. नामांकित कर्करोग तज्ज्ञांनी या पद्धतीला मान्यता दिली असून, उपचारासाठी सुमारे सहा महिने लागले. आज दोन्ही रुग्ण पूर्णपणे निरोगी असून, नामको हॉस्पिटलची ही क्रांतिकारी पद्धती जगभरातील रुग्णांसाठी नवी आशा ठरत आहे.
