धायरीतील घटना; नांदेडसिटी पोलिसांनी दोघांना अटक, एक कामगार फरार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दारू पिताना मोबाईल घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादात तिघांनी आपल्या सहकारी कामगाराचा बेदम मारहाण करून खून केला. नांदेडसिटी पोलिसांनी दोघा कामगारांना अटक केली असून त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे.
खून झालेल्या कामगाराचे नाव देवा उर्फ देवीदास व्यंकटराव पालते (वय २५, रा. धायरी) असे आहे. गजानन हरिचंद्र राठोड (रा. हिवाळणी तलाव, पो. आडगाव, ता. पुसद, जि. यवतमाळ) आणि रुद्र गवते (रा. साईधाम, त्रिनेश इंजिनिअरिंग कंपनीजवळ, धायरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
त्यांचा एक साथीदार दिनेश राठोड हा फरार आहे. याबाबत पोलीस अंमलदार शिवाजी क्षीरसागर यांनी नांदेडसिटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना धायरी येथील त्रिनेश इंजिनिअरिंग कंपनीच्या पहिल्या मजल्यावर २७ जुलै रोजी मध्यरात्री घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी पेंटर असून पेंटिंगचे काम करत असताना ते सध्या तेथेच राहत होते. देवा पालते याच्याकडे सध्या मोबाईल नव्हता. त्यामुळे घरी फोन करण्यासाठी तो इतरांचा मोबाईल वापरत असे.
दिवसभर काम केल्यानंतर हे सर्वजण रात्री दारू पित बसले होते. त्यावेळी मोबाईल घेण्यावरून त्यांच्यात भांडण झाले. त्यावेळी तिघांनी मिळून देवाच्या नाकावर, ओठावर आणि डोळ्याजवळ कशानेतरी मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला आणि तेथेच कोसळला. इतर तिघेजण दारू पिऊन निघून गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ही बाब तेथील लोकांच्या लक्षात आली. त्यांनी नांदेडसिटी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तपास करून दोघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण जाधव करत आहेत.
