कंपनी व सेबीच्या नियमांचे उल्लंघन करून ग्राहकांकडून वैयक्तिक खात्यात पैसे घेऊन फसवणूक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शेअर मार्केटविषयक प्रशिक्षण देणाऱ्या कंपनीतील महिला रिलेशनशिप मॅनेजरने कंपनी व सेबीच्या नियमांचे उल्लंघन करून ग्राहकांचे पैसे वैयक्तिक खात्यावर घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत सुनीलकुमार सत्यकुमार सिंग (वय ३९, रा. मगरपट्टा सिटी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी श्वेता उमेश सावंत (वय ३२, रा. नारायणनगर, नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार कल्याणीनगर येथील ‘प्रॉफिट मार्ट सेक्युरिटीज’ या कंपनीमध्ये १२ मे २०२० ते १३ ऑक्टोबर २०२४ दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे प्रॉफिट मार्ट सेक्युरिटीज या कंपनीमध्ये व्यवस्थापक आहेत.
त्यांच्या कंपनीच्या भारतभर ३५ आणि महाराष्ट्रात १० शाखा आहेत. कंपनीचे सर्व व्यवहार ऑनलाईन स्वरूपाचे आहेत. सर्व शाखांमध्ये ग्राहकांची डीमॅट खाती उघडून त्यांना शेअर मार्केटचे प्रशिक्षण दिले जाते.
श्वेता सावंत या नाशिक शाखेत ४ वर्षांपासून रिलेशनशिप मॅनेजर म्हणून नोकरी करत होत्या. त्यांच्याकडे कंपनीच्या ग्राहकांची डीमॅट खाती उघडून देणे आणि शेअर मार्केटचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी होती. कंपनीच्या व सेबीच्या नियम व अटीप्रमाणे कोणत्याही कर्मचाऱ्याला कंपनीच्या व्यवसायाप्रमाणे दुसऱ्या ठिकाणी नवीन व्यवसाय सुरु करता येत नाही.
तसेच कंपनीच्या कोणत्याही ग्राहकाचे पैसे स्वत:च्या वैयक्तिक बँक खात्यावर घेता येत नाहीत. श्वेता सावंत ऑक्टोबर २०२४ पासून कंपनीला काहीही न सांगता कामावर येत नसल्याने, कंपनीने १३ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांना नोकरीवरून काढून टाकले.
त्यानंतर, ११ फेब्रुवारी २०२५ रोजी नाशिकमधील एका महिला ग्राहकाने ईमेलद्वारे तक्रार केली की, श्वेता सावंत यांनी उच्च परताव्याचे आमिष दाखवून तिच्याकडून २०२० पासून वेळोवेळी ७ लाख ४०० रुपये घेतले असून आपली आर्थिक फसवणूक झाली आहे.
कंपनीचे नाशिक शाखा प्रबंधक दीपक भिमजानी यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता, हा प्रकार खरा असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या अहवालानुसार कंपनीच्या वतीने फसवणुकीची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
