कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल : पोलिस उपायुक्तांनी तीन वर्षांसाठी वेतनवाढ रोखली
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्यानंतर तेथे पोलिस मदत केंद्र सुरू करण्यात आले. या पोलिस मदत केंद्रातील पोलिस अंमलदाराने तेथे आलेल्या तरुणांना अटक करण्याची भीती दाखवून लुटले होते. या पोलिस अंमलदारावर पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी कारवाई केली आहे.
विक्रम लक्ष्मण वडतीले असे शिक्षा झालेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे. त्यांची वार्षिक वेतनवाढ तीन वर्षांसाठी रोखण्यात आली आहे. ही घटना ४ व ५ जून २०२५ रोजी सकाळी ९ वाजता घडली होती.
अदमान अफसर रजा (वय १९, रा. चेन्नई) व त्यांचे दोन नातेवाईक हे बोपदेव घाटात फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी विक्रम वडतीले यांनी त्यांना अटक करण्याची भीती दाखवून आपल्या कारमधून कोंढवा पोलिस ठाण्याच्या दारात आणले.
तेथून त्यांना ससून रुग्णालयात घेऊन गेले. त्यांच्याकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांची मागणी करून आपल्या मित्र केदार जाधव याच्या गुगल पे खात्यावर २८ हजार रुपये घेतले. याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कर्तव्यावर असताना कोणालाही न सांगता पॉईट सोडून तो निघून गेला. तसेच या घटनेची नोंद अथवा कारवाई न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तक्रारदारांना धमकावून पैसे स्वीकारले. या तरुणांनी तक्रार केल्यानंतर त्यांना परत पैसे पाठवले, असे तपासात निष्पन्न झाले.
मार्केटयार्ड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी केलेल्या चौकशीत हे गैरवर्तन झाल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी विक्रम वडतीले यांना वार्षिक वेतनवाढ तीन वर्षांसाठी रोखण्याची शिक्षा सुनावली आहे.
