सांगलीतील दुसऱ्या राज्य टेबल टेनिस स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : सांगली येथील सुरज फाउंडेशन व सांगली जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित दुसरी महाराष्ट्र राज्य रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा 27 ते 31 जुलै 2025 या कालावधीत अत्यंत उत्साहात पार पडली.
या स्पर्धेमध्ये 11, 13, 15, 17, 19 वर्षांखालील मुले-मुली व खुल्या गटातील पुरुष व महिला या विविध गटांमध्ये 750 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला, ही आजपर्यंतची सर्वाधिक नोंद ठरली.
या स्पर्धेत बार्शीच्या राजवर्धन तिवारी याने 11 वर्षांखालील मुलांच्या गटात उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. त्याच्या या यशामुळे बार्शीचे नाव राज्यस्तरावर उजळले असून त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
बक्षीस वितरण समारंभ दिनांक 31 जुलै रोजी पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना गौरविण्यात आले.
समारंभाची सुरुवात महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण लुंकड यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना खेळामध्ये सातत्य ठेवण्याचा व स्पोर्ट्समध्ये करिअर घडविण्याचा सल्ला दिला.
प्रमुख पाहुणे समित कदम यांनी ‘खेलो इंडिया’ आणि ग्रँड मास्टर बुद्धिबळ स्पर्धा यांचा संदर्भ देत सांगली जिल्ह्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावे असे आवाहन केले. तसेच सांगलीमध्ये स्पोर्ट्स क्षेत्रात भरीव पावले उचलली जातील, असेही आश्वासन त्यांनी दिले.
सूत्रसंचालन विनायक जोशी यांनी केले.
कार्यक्रमास बन्सी ओस्तवाल, बजरंग पाटील, भालचंद्र पाटील, उपाध्ये सर (उपाध्ये हायस्कूल), दीपक भांडवलकर (PI MIDC पोलीस), रवींद्र मिरजकर, सी. वसंतकुमार, रघुनाथ सातपुते, ॲड. राजेंद्र पाचोरे, दत्तात्रय मुळे, श्रीशैल मोटगी, डॉ. यशवंत तोरो (अध्यक्ष – नव कृष्णा व्हॅली स्कूल कमिटी) आदी मान्यवर उपस्थित होते. आभार प्रदर्शन सुरज फाउंडेशनच्या डायरेक्टर व नव कृष्णा व्हॅली स्कूलच्या मुख्याध्यापक संगीता पागनीस यांनी केले.
