‘नृत्यांजली’ कार्यक्रमात भावपूर्ण सादरीकरणानंतर सन्मान : कलाभारती इन्स्टिट्यूट ऑफ कथकतर्फे गौरव
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सांस्कृतिक कलेत प्राविण्य प्राप्त करत अमेरिकेतील ओजल समदरियाने भारतीय अभिजात नृत्यकलेचा सन्मान जागतिक स्तरावर वाढविला आहे. पुणे येथील कलाभारती इन्स्टिट्यूट ऑफ कथक या संस्थेच्या पदविका कार्यक्रमात ओजल हिला गौरवण्यात आले.
अमेरिकेतील सिनसिनाटी स्टेट येथे वास्तव्यास असलेल्या ओजल समदरिया हिला पुण्यातील कलाभारती इन्स्टिट्यूट ऑफ कथक संस्थेची कथक नृत्यकलेतील पदविका प्रमाणपत्र संस्थेच्या अध्यक्षा सुचेता हरिदास यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
हा समारंभ शनिवार, दिनांक २६ जुलै २०२५ रोजी सायंकाळी स.प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहात पार पडला. या वेळी ‘नृत्यांजली’ या कथक नृत्याविष्कारात ओजलने विविध अभंग व भावनांनी परिपूर्ण नृत्य सादरीकरण केले.
गेल्या अनेक वर्षांपासून ओजलने कलाभारतीमध्ये नृत्यकौशल्याचे धडे घेतले असून, अमेरिकेत राहूनही तिने भारतीय सांस्कृतिक नृत्यकलेत सातत्य ठेवून अथक परिश्रम घेतले आहेत. या वेळी सुचेता हरिदास म्हणाल्या, “कथक हे केवळ नृत्य नसून, ताल, लय आणि भाव यांच्या समन्वयातून साकारलेली एक अभिजात कलाकृती आहे.
त्यासाठी साधना आणि तपश्चर्या आवश्यक असते आणि ती ओजलने सिद्ध केली आहे.” कार्यक्रमाच्या प्रारंभी रमेशलाल समदरिया, राजकुमार चोरडिया, सुचेता हरिदास, रुपा आणि संदेश समदरिया यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यानंतर ओजलने गणेश वंदना, तीन ताल, तराणा, कृष्णभजन आणि नवकार मंत्र या विविध भागांवर कथक नृत्य सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. या यशाचे श्रेय ओजलने आपल्या गुरु सुचेता हरिदास व आई रुपा समदरिया यांना दिले, तर बहिण निलिन हिने नेहमीच साथ दिली असल्याचे तिने नमूद केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलम चोरडिया गोयल यांनी केले, तर आभार प्रदर्शन निलिन समदरिया यांनी केले.
