मराठी व इंग्रजी वक्तृत्व स्पर्धांनी कार्यक्रमाला मिळाली विशेष रंगत
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : सुलाखे हायस्कूल, बार्शी येथे आज दिनांक १ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचा व प्रेरणादायी विचारांचा जागर करणारा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या निमित्ताने मराठी व इंग्रजी भाषेतील वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मराठी स्पर्धेत इ. ८ वी ड चे श्रवण आरसूल याने प्रथम क्रमांक, इ. ८ वी क ची नागटिळक गार्गी हिने द्वितीय क्रमांक तर इ. ९ वी क चा हामने दिपराज याने तृतीय क्रमांक पटकावला.
इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत इ. ८ वी फ च्या शेख रिदा एजाज हिने प्रथम तर झांबरे किमया हिने द्वितीय क्रमांक मिळवून उत्तम विचार मांडले. विद्यार्थ्यांनी टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील प्रेरणादायी घटनांवर प्रभावी भाषणे सादर केली. परीक्षक म्हणून धनाजी राऊत, वैभव कदम, मंगल माळी, व किरण लांडे यांनी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले.
कार्यक्रमात शिक्षक जयसिंग कदम सर यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना विचारप्रवृत्त करणारे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक स्वामीराव हिरोळीकर, उपमुख्याध्यापक रामकृष्ण इंगळे, शालेय समिती सदस्य सुहास देशमुख व पर्यवेक्षक प्रसन्न देशपांडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपमुख्याध्यापक रामकृष्ण इंगळे यांनी भूषवले. सुहास देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंगल माळी यांनी उत्कृष्टपणे पार पाडले.
