‘पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब’चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे महानगर क्षेत्राच्या सर्वांगीण आणि दीर्घकालीन विकासासाठी एक ऐतिहासिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब’ या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यशदा, पुणे येथे संपन्न झाला. हा उपक्रम नीती आयोग, महाराष्ट्र शासन आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जात आहे.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, नीती आयोगाचे CEO बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम, पुणे इंटरनॅशनल सेंटरचे प्रमुख पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, अपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, तसेच पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत पुणे महानगर क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी एक व्यापक मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार आहे. हा प्लॅन ‘इंडिया@2047’ या दीर्घकालीन दृष्टीकोनाशी सुसंगत असेल. पुण्याचे जीडीपी दुप्पट करणे, दरडोई उत्पन्न वाढविणे आणि पुणे हे जागतिक दर्जाचे शहर बनविणे, अशी उद्दिष्टे या उपक्रमातून साध्य करण्यात येणार आहेत.
“पुणे हे शहर नव्या क्षेत्रांत पाय रोवून आपले सामर्थ्य सिद्ध करण्यास सक्षम आहे. या ग्रोथ हबच्या माध्यमातून तयार होणारा मास्टर प्लॅन निश्चितच पुण्याला नवी दिशा देईल.” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
