वाघोली पोलिसांची कामगिरी : बस वेगाने शेजारून गेल्याने दारूच्या नशेत केली हाणामारी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बीडला जाणारी ट्रॅव्हल बस अहिल्यानगर रोडवरील बकोरी फाटा येथे प्रवासी घेण्यासाठी थांबली असताना, तिच्यात शिरून चालक व वाहकांना मारहाण करून लुटणाऱ्या चौघांना वाघोली पोलिसांनी अटक केली आहे.
साहिल संतोष बवले (वय २२, रा. कोरेगाव भिमा), ओंकार सुरेश साकोरे (वय २१, रा. बीजेएस फाटा, वाघोली), महेश विठ्ठल कवडे (वय २०, रा. बकोरी फाटा, वाघोली) आणि नितांत चंद्रशेखर छपानी मोहन (वय २०, रा. बकोरी फाटा, वाघोली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
बस वेगाने शेजारून गेल्याने, त्यांनी बस थांबलेली असताना दारूच्या नशेत बसमध्ये जाऊन हाणामारी केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. याबाबत भाऊसाहेब युवराज मिसाळ (वय २६, रा. मयूर, नायगाव, ता. पाटोदा, जि. बीड) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २४ जुलै रोजी रात्री वाघोलीतील समृद्धी लॉजसमोर घडला होता.
फिर्यादी हे बस उभी करून प्रवाशांची वाट पाहत असताना तिघे जण बसमध्ये शिरले. त्यांनी चालक व वाहक यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेतले आणि बाजूने आलेल्या स्वीफ्ट कारमधून पळून गेले होते.
भर रस्त्यावर आणि अनेकांच्या समोर घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना फिर्यादीला कारचा अर्धवट नंबर मिळाला होता. त्याचवेळी आजूबाजूच्या सीसीटीव्हीवरून मिळालेली माहिती आणि ते स्थानिक असल्यामुळे बातमीदारांनी त्यांना ओळखून दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी चोरलेली रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण २ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) आसाराम शेटे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, ठोंबरे, प्रदीप मोटे, मंगेश जाधव, सुनील कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दीपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रेमत वाघ, शिवाजी चव्हाण, सतीश बिरादार यांनी केली आहे.
