गाडी वेगाने व वेडीवाकडी का चालवतो, विचारल्याने केले कृत्य : चौघांना अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना, “गाडी एवढ्या वेगात आणि वेडीवाकडी का चालवितोस?” असे विचारल्यामुळे भर चौकात चार जणांनी पोलीस मार्शलला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी छाती, पोट, पाठ आणि डोक्यावर बेदम मारहाण केली. त्यांना वाचविण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही आरोपींनी मारहाण केली. या झटापटीत पोलिसांचा गणवेशही फाटला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अशा घटना शहरात घडू लागल्यामुळे पोलिसांची भीती उरलेली नसल्याची टीका होत आहे.
याबाबत खंडणीविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गोपाल देवसिंग गोठवाल (वय २८) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जुनैद इक्बाल शेख (वय २७, रा. आदित्यनगर, भोसरी), नफीज नौशाद शेख (वय २५, रा. आदित्यनगर, भोसरी), युनुस युसुफ शेख (वय २५, रा. गौरीनगर, भोसरी, मूळ रा. भुसावळ) आणि आरिफ अक्रम शेख (वय २५, रा. संत तुकारामनगर, भोसरी) यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना मुंबई-पुणे रोडवरील चर्च चौकात ३१ जुलै रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस अंमलदार गोपाळ गोठवाल आणि पो.शि. काजळे हे खंडणीविरोधी पथकात कार्यरत असून सध्या खडकी पोलीस ठाण्यांतर्गत कॉप्स २४ मार्शल ड्युटीवर कार्यरत आहेत. ते मुंबई-पुणे महामार्गावर पेट्रोलिंग करत असताना खडकी मेट्रो स्टेशनजवळ पोहोचले. त्याचवेळी दोन तरुण केटीएम मोटारसायकलवरून अत्यंत वेगात व वेडीवाकडी गाडी चालवत पुढे गेले.
चर्च चौकात सिग्नलला थांबले असताना पोलिसांनी गाडी अशा प्रकारे का चालविताय, असे विचारले. त्यावर आरोपींनी शिवीगाळ करत, “तू कोण मला विचारणारा?” असे म्हणत आक्रमक वर्तन केले. पोलिसांनी गाडी बाजूला घेण्यास सांगितले असता, केटीएमवरील दोघे खाली उतरले आणि त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. नंतर त्यांच्या आणखी दोन साथीदारांनी घटनास्थळी येऊन दोघा पोलीस मार्शलना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
पो.शि. काजळे यांनी गोठवाल यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनाही शिवीगाळ करून रोखले गेले. चौघांनी मिळून गोठवाल यांना छाती, पोट, पाठ आणि डोक्यावर मारहाण केली. काजळे यांनी तात्काळ वायरलेसवर संदेश दिला. काही वेळातच पिटर मोबाईलमधून पोलीस अंमलदार माळी आणि डोंगरे सह पोलीस व्हॅन घटनास्थळी पोहोचली आणि चौघांना अटक करण्यात आली.
या हल्ल्यात गोठवाल यांच्या छाती, पोट, पाठ आणि डोक्याला मुकामार लागले असून, त्यांच्या गणवेशासह आतील बनियनही फाटली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले करत आहेत.
