मोटारसायकलवरुन आलेल्या चौघांवर आळ घेऊन केली दिशाभूल : काळेपडळ पोलिसांनी खुन्याला केली अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दारू पिल्यानंतर आई-बहिणीविषयी शिवीगाळ केल्यामुळे चिडलेल्या नर्सरी चालकाने झोपलेल्या मित्रावर लोखंडी पहारेने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर स्वतः पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून, मोटारसायकलवरून आलेल्या चौघांनी मारहाण केल्याचे सांगत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काळेपडळ पोलिसांनी त्याचा डाव उधळून लावत दोन तासांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणत आरोपीला अटक केली.
रविकुमार शिवशंकर यादव (वय ३३, रा. साईगंगा सोसायटीसमोरील पत्र्याची शेड, हांडेवाडी रोड) असे खून झालेल्याचे नाव आहे. किसन राजमंगल सहा (वय २०, रा. हांडेवाडी रोड, मूळ रा. मोतीहारी, बिहार) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसन सहा याची रस्त्याच्या कडेला नर्सरी आहे. त्याच परिसरात रविकुमार यादव रस्त्याच्या कडेला टेडी बेअर विकत असे व पत्र्याच्या शेडमध्ये राहत होता. शनिवारी पहाटे ४ वाजून ५२ मिनिटांनी किसन सहा याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून सांगितले की, रविकुमार यादव याला मोटारसायकलवरून आलेल्या चार जणांनी दुकानातून बेडसिट व गादी दिली नाही म्हणून मारहाण केली आहे.
ही माहिती मिळताच रात्रगस्त अधिकारी उंड्री-हांडेवाडी रोडवरील पत्र्याच्या शेडमध्ये गेले. तेथे रविकुमार यादव रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. सहायक पोलीस निरीक्षक सुतार यांनी त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
यानंतर पोलिसांनी किसन सहा याच्याकडे वारंवार चौकशी केली असता त्याच्या जबाबांमध्ये विसंगती आढळली. आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता घटनास्थळी चार जण मोटारसायकलवरून आलेले दिसले, मात्र त्यांनी कोणतीही हालचाल केली नसल्याचे स्पष्ट झाले. किसन सहा वारंवार आपले स्टेटमेंट बदलत होता. शेजारी राहणाऱ्या नागरिकांकडून चौकशी केली असता दोघांमध्ये भांडण झाल्याची माहिती मिळाली.
यानंतर पोलिसांनी किसन सहा याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खून केल्याची कबुली दिली. रविकुमार यादव व किसन सहा रात्री दारू पित बसले असताना, रविकुमारने विनाकारण आई-बहिणीविषयी शिवीगाळ करून मारहाण केली.
यापूर्वीही त्याने अशाच प्रकारे शिवीगाळ केली होती. त्यामुळे रागाच्या भरात पहाटे झोपेत असताना किसनने त्याच्या डोक्यात लोखंडी पहारेने वार करून त्याचा खून केला. त्याच वेळी मोटारसायकलवरून चार जण त्या ठिकाणी आले होते. त्यांचा गैरफायदा घेऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी खरा प्रकार उघडकीस आणून त्याला दोन तासांत अटक केली.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रगस्त अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार, रत्नदीप गायकवाड, अमित शेटे, पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर, पोलीस हवालदार प्रविण काळभोर, प्रतीक लाहिगुडे, दाऊद सय्यद, किशोर पोटे, प्रविण कांबळे, परशुराम पिसे, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, सद्दाम तांबोळी, अतुल पंधरकर, महादेव शिंदे, प्रदीप बेडीस्कर, श्रीकृष्ण खोकले, नितीन शिंदे यांनी केली.
