तलवारीने वाहनांची केली होती तोडफोड : खडकी पोलिसांनी तलवारीसह केली अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : भावावर इराणी समाजातील लोकांनी हल्ला केल्याने झालेल्या वादात तलवारीने तोडफोड करून गेले चार महिने फरार असलेल्या गुन्हेगाराला खडकी पोलिसांनी तलवारीसह जेरबंद केले.
राजसिंग युवराजसिंग जुनी (वय २८, रा. पाटील इस्टेट) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. राजसिंग जुनी याच्या भावावर काही जणांनी हल्ला केला होता. त्याचा राग मनात धरून राजसिंग जुनी व त्याचे चार ते पाच साथीदार पाटकर प्लॉटमध्ये शिरले व तेथे पार्क केलेल्या मोटारसायकलींवर धारदार शस्त्रांनी वार करून नुकसान केले.
त्यांनी जोरजोरात आरडा-ओरडा, शिवीगाळ, दमदाटी करत हवेत शस्त्रे फिरवून दहशत निर्माण केली होती. हा प्रकार २ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता घडला होता. याबाबत सय्यदनूर जान शहा इराणी (वय ५६, रा. पाटकर प्लॉट, शिवाजीनगर) या रिक्षाचालकाने फिर्याद दिली होती. या घटनेनंतर राजसिंग जुनी हा गेल्या चार महिन्यांपासून फरार होता.
पोलीस अंमलदार दिनेश भोये यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मुळा नदीच्या काठावर पाटील इस्टेटमध्ये संबंधित गुन्हेगार बुलेट मोटारसायकलसह थांबलेला आहे. या माहितीनुसार पोलिसांनी तेथे जाऊन राजसिंग जुनी याला पकडले. त्याने लपवून ठेवलेली लोखंडी तलवार पोलिसांनी जप्त केली आहे.
खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, पोलीस अंमलदार शशी सपकाळ, प्रताप केदारी, शशांक डोंगरे, गालिब मुल्ला, सुधाकर राठोड, दिनेश भोये, अनिकेत भोसले, ऋषिकेश दिघे यांनी ही कारवाई केली.
