आणखी १२ लाखांची मागणी, जीवे मारण्याची दिली धमकी : सावकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : व्यवसायासाठी वेळोवेळी घेतलेल्या अडीच लाखांच्या कर्जाच्या बदल्यात त्यांनी १६ लाख ८३ हजार रुपये परत केले. तरीही त्यांच्याकडे आणखी १२ लाखांची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत हितेश रवी उत्तमचंदानी (वय ३६, रा. लुल्लानगर) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी प्रशांत गुरुनाथ गायकवाड (रा. रक्षकनगर, खराडी) याच्याविरुद्ध सावकारी अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार खराडीतील झेन्सार पार्क येथील कैलास डेअरी येथे फेब्रुवारी २०२३ ते जुलै २०२५ दरम्यान घडला.
प्रशांत गायकवाड याला तडीपार केल्याचे सांगितले जाते. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा लुल्लानगर चौक येथे “कैलास डेअरी फार्म” या नावाने डेअरी व्यवसाय आहे. २०२१ ते २०२४ दरम्यान त्यांचे झेन्सार आयटी पार्कसमोर मिठाई व दूध पदार्थांचे दुकान होते.
२०२३ साली त्यांच्या दुकानात प्रशांत गायकवाड हा लस्सी पिण्यासाठी येत होता. त्याच्याशी चांगली ओळख झाली. काही दिवसांनी फिर्यादी यांना पैशांची गरज भासल्याने त्यांनी प्रशांत गायकवाड याच्याकडे पैशांची मागणी केली. २४ फेब्रुवारी २०२३ रोजी त्याने ४० हजार रुपये दिले. एक महिन्यानंतर त्याने त्या रकमेसाठी ३०९९ रुपये व्याज मागितले. त्यांनी ते व्याज दिले.
दरम्यान, फिर्यादी यांनी मार्च २०२३ ते मे २०२५ दरम्यान वेळोवेळी एकूण २ लाख ५१ हजार २४९ रुपये घेतले. त्या मोबदल्यात गायकवाडने व्याजाच्या नावाखाली दमदाटी करून एकूण १४ लाख ३३ हजार ७६२ रुपये ऑनलाईन स्वरूपात घेतले.
तसेच, प्रशांत गायकवाड याचा जनहित नागरी पतसंस्था वडगाव शेरीमधील डेली कलेक्शन करणारा कर्मचारी रोज येत असे. त्याला दररोज रोख स्वरूपात १ हजार रुपये, तर गायकवाड याच्या खात्यावर ऑनलाईन ३०० रुपये पाठवले जात होते. असे एकूण २ लाख ५० हजार रुपये दिले आहेत.
प्रशांत गायकवाड याला एकूण १६ लाख ८३ हजार ७६२ रुपये दिलेले आहेत. ऑक्टोबर २०२४ मध्ये त्याने फोन करून अरेरावी करत आणखी १२ लाख रुपये देणे बाकी असल्याचे सांगून पैशांची मागणी केली. त्यावेळी फिर्यादी यांनी घेतलेल्या पैशांच्या मोबदल्यात व्याजासह सर्व पैसे परत दिले होते. त्यानंतरही तो सतत फोन करून पैसे दिले नाहीत तर जीवे मारण्याची धमकी देत आहे.
१७ जुलै रोजी प्रशांत गायकवाड त्यांच्या घरी आला. त्यावेळी घरात त्यांच्या पत्नी होत्या. त्याने जोरजोरात दरवाजा वाजवून “तू बाहेर ये, मी कोण आहे ते दाखवतो तुला, तुझा नवरा कुठे आहे?” असे म्हणत धमकी दिली.
त्यांच्या पत्नीने घाबरून दरवाजा उघडला नाही. त्यानंतर तो निघून गेला. त्यामुळे त्यांनी त्या वेळी घाबरून तक्रार दिली नव्हती.प्रशांत गायकवाड याच्याविरुद्ध सावकारी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.
