सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी : अंधाराचा गैरफायदा घेत हिसकावली होती अष्टपैलू मण्याची माळ
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पायी जाणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील अष्टपैलू मण्याची माळ हिसकावून नेणाऱ्या चोरट्यांना सिंहगड रोड पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून चोरलेली सोनसाखळी व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
झील कॉलेज चौक येथे राहणाऱ्या ७६ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यात ३ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता ओएसीस सोसायटीसमोर आल्या असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील अष्टपैलू मण्याची २५ हजार रुपयांची सोन्याची माळ जबरदस्तीने हिसकावून नेली होती.
सिंहगड रोड पोलीस तपास करत असताना पोलीस अंमलदार आण्णा केकाण, तानाजी सागर व निलेश भोरडे यांना त्यांच्या बातमीदारांकडून समजले की वृद्ध महिलेची सोनसाखळी चोरणारे धायरीतील अंबाईदरा येथे थांबले आहेत. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन खात्री करून दोघांना ताब्यात घेतले.
चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरी केलेली ६० हजार रुपयांची सोन्याची माळ व ३० हजार रुपयांची चोरीची मोटारसायकल असा ९० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार उत्तम तारु, आण्णा केकाण, विकास बांदल, देवा चव्हाण, सागर शेडगे, निलेश भोरडे, तानाजी सागर, राहुल ओलेकर, गणेश झगडे, विनायक मोहिते, सतिश मोरे, संदीप कांबळे, समीर माळवदकर आणि शिरीष गावडे यांनी केली आहे.
