गुन्हे शाखेच्या युनिट ५ ची कामगिरी : वानवडीतील गुन्ह्यात २ वर्षांपासून होते फरार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वानवडी परिसरातील २०२३ मध्ये खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात गेले २ वर्षे फरार असलेल्या तिघा गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने कर्नाटकातील विजापूर येथून अटक केली आहे.
सिकंदर आयुब शेख ऊर्फ सय्यद (वय ३४), जाकीर कादीर सय्यद (वय ४२) आणि अमीर अकील सय्यद (वय २३, तिघे रा. सय्यदनगर, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वानवडी परिसरात २०२३ मध्ये टोळक्याने तरुणाचा खून करून त्याच्या साथीदारांना जखमी केले होते.
या गुन्ह्यात वानवडी पोलिसांनी खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमविणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाले होते. ते वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत होते.
या गुन्ह्यातील फिर्यादीला ते वेळोवेळी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत होते. या फरार आरोपींच्या शोधासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला.
तेव्हा हे तिघे जण कर्नाटकातील विजापूर येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथक विजापूरला पोहोचले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिघांना विजापूरातून ताब्यात घेतले.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहाय्यक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खरात, पोलीस अंमलदार राजस शेख, प्रशांत कर्णवर, नासेर देशमुख यांनी केली आहे.
