धनकवडीत गुन्हे शाखेची कारवाई : २ लाख २० हजारांचा माल जप्त, ७ जणांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : धनकवडी परिसरातील अष्टद्वार सोसायटीजवळील जुन्या पत्र्याच्या कारखान्यात रंगलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने छापा टाकला. त्यात भारतीय जनता पक्षाचा पर्वती विधानसभा मतदारसंघाचा चिटणीस तीन पत्ती जुगार खेळताना आढळून आला.
या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औदुंबर विठ्ठल कांबळे असे या भाजपच्या चिटणीसाचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार विजयकुमार पवार यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी संग्राम दिलीप भोसले (वय ४८, रा. विवेकानंद नगर सोसायटी, संतनगर), औदुंबर विठ्ठल कांबळे (वय ४२, रा. खंडाळे चौक, पद्मावती), मंगेश मारुती शेलार (वय ३९, रा. महात्मा गांधी सोसायटी, पद्मावती), युवराज नानासाहेब सूर्यवंशी (वय ३८, रा. शिवांजय, पुण्याईनगर, धनकवडी), सागर नारायण अडागळे (वय ३१, रा. महात्मा गांधी सोसायटी, पद्मावती), बापू लक्ष्मण पाटोळे (वय ५९, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), रोहन शेखर लोंढे (वय ३२, रा. इंदिरा गांधी सोसायटी, सहकारनगर, पद्मावती) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.
गुन्हे शाखेच्या युनिट २ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस हवालदार शंकर कुंभार, विजय पवार, उज्वल मोकाशी हे धनकवडी भागात सोमवारी सायंकाळी गस्त घालत असताना त्यांना धनकवडी परिसरातील एका रिकाम्या पत्र्याच्या कारखान्यात काही जण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर सहकारनगर पोलीस व गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने येथे छापा टाकला. त्यात औदुंबर कांबळे याच्यासह ७ जण तेथे जुगार खेळत असल्याचे आढळून आले. त्यांच्या अंगझडतीत १० हजार २५० रुपये, जुगाराची साधने, मोबाईलसह एकूण २ लाख २० हजार ५५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
सहकारनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस फौजदार बी. के. खुटवड तपास करत आहेत.
