व्यावसायिकाला ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या बीडच्या चार जणांना अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गँगस्टर अरुण गवळीचा पीए बोलतोय, असे सांगून ५ कोटींची खंडणी मागणारे आणि ते पैसे घेण्यासाठी आलेल्या बीडमधील चार जणांना लष्कर व गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
याबाबत गुलटेकडी येथील एका ४९ वर्षीय व्यावसायिकाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी रोहन शिवाजी गवारे (वय ३०, रा. शीतल अपार्टमेंट, कोरेगाव पार्क), सुदर्शन आसमान गायके (वय २७, रा. वाळुंज, संभाजीनगर), महेंद्र रामनाथ शेळके (वय ४२, रा. शाहूनाथनगर, बीड) आणि कृष्णा परमेश्वर बुधनर (वय २६, रा. खामगाव, ता. जि. बीड) अशी अटक केलेल्यांची नावे जाहीर केली आहेत. सुमित चौरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे कॅम्प परिसरात कार्यालय आहे. आरोपी सुमित चौरे याच्याशी २०२२ मध्ये एका बांधकाम प्रकल्पाबाबत फिर्यादी यांनी व्यवहार केला होता. हॉटेल ओरिला या बांधकाम व्यवहाराबाबत फिर्यादी यांना कोणतेही पैसे देणे लागलेले नाही.
या व्यवहारातील बांधकाम महापालिकेने बेकायदेशीर ठरवून ते पाडून टाकले आहे. त्यामुळे आपले नुकसान झाल्याचा सुमित चौरे याचा दावा असून, त्या पैशांची मागणी त्याने फिर्यादी बांधकाम व्यावसायिकाकडे केली होती.
फिर्यादी हे त्यांच्या कार्यालयात असताना २८ जुलै रोजी त्यांना एक फोन आला. ‘‘मी प्रशांत पाटील, अरुण गवळीचा पीए बोलतोय,’’ असे फोन करणाऱ्याने सांगितले. सुदर्शन गायके यानेच अरुण गवळीचा पीए बोलतोय, असे सांगून फोन केला. सुदर्शन गायके हा चौरे याचा भाऊ आहे. त्या व्यवहारात तडजोड करण्यासाठी पीए म्हणून फोन करणाऱ्याने त्यांना धमकावले.
त्यानंतर ४ ऑगस्ट रोजी गायके आणि त्याचा मित्र हे फिर्यादी यांच्या कार्यालयात आले. त्यांनी ‘‘प्रशांत पाटील हा डॅडीचा खासगी सचिव आहे. त्यांना तुमच्या कार्यालयात आणून बसवतो,’’ अशी धमकी देऊन निघून गेले.
यानंतर ९ ऑगस्ट रोजी फिर्यादी यांना पुन्हा फोन करून ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादी यांनी लष्कर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली. ११ ऑगस्ट रोजी फिर्यादी यांना गायके याचा फोन आला.
त्याने फिर्यादी यांना विमाननगर येथील एका हॉटेलमध्ये पैसे घेऊन बोलावले. त्यावेळी गुन्हे शाखेचे पथक आणि लष्कर पोलिसांनी तेथे सापळा रचून, पैसे घेण्यासाठी आलेल्या चौघांना अटक केली.
गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे.
लष्कर पोलीस पथक, गुन्हे शाखा खंडणीविरोधी पथक आणि गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने ही कारवाई केली. हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल दांडगे करीत आहेत.
