गळफास घेऊन संपविले जीवन, लोणीकंद पोलिसांनी पती, सासूला केली अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : तिचे लग्न होऊन अवघे ३ महिने झाले होते. या तीन महिन्यांत तिच्या पती, सासूने घरात एकटे ठेवून, तिचा मोबाईल फोडून, तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला. या छळाला कंटाळून १८ वर्षांच्या नवविवाहितेने केवळ ३ महिन्यांतच गळफास घेऊन आत्महत्या केली.
राणी मुंजाजी घाडगे (वय १८, रा. डोंगरगाव, ता. हवेली) असे या नवविवाहितेचे नाव आहे. याबाबत तिचा मामा महादेव कदम (वय ४१, रा. साईनगर, चंदननगर, मुळ रा. गंगाखेड, जि. परभणी) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी पती भागवत अंकुश कदम (वय २४) आणि सासू मुक्ता अंकुश कदम (वय ४५, रा. डोंगरगाव, ता. हवेली) यांना अटक केली आहे. हा प्रकार डोंगरगाव येथील राहत्या घरी २४ मे ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींच्या भाची राणी घाडगे हिचा विवाह भागवत कदम याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच राणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वेळोवेळी मारहाण केली. “तू जा मर” असे बोलून तिचा मोबाईल फोन फोडून टाकला.
तिला कोणाशीही बोलू न देणे, घरात एकटे ठेवणे आणि तिला दोघांनी शारीरिक व मानसिक त्रास देणे असे प्रकार सुरू होते. या छळाला कंटाळून तिने ८ ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.
सहायक पोलीस निरीक्षक विजया वंजारी तपास करीत आहेत.
