सुषमा चोरडिया यांचे मत : गुणवंतांचा सन्मान व प्रेरणादायी सोहळा
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : “विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक आणि त्यांच्या भविष्याला दिशा देणारा गुणवंतांचा सन्मान हा त्यांच्या आत्मविश्वास, जबाबदारीची भावना आणि सेवाभाव जोपासण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. विविध उपक्रमांद्वारे सूर्यदत्त संस्था विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन देत असून, त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा अविरत प्रयत्न करते,” असे प्रतिपादन सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी केले.
सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्च (एससीपीएचआर) व नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन (एनपीडब्ल्यूए) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फार्मोत्सव २०२५’चे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यात महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलचे माजी अध्यक्ष व फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य विजय पाटील, पुणे प्रादेशिक तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, तसेच ‘एनपीडब्ल्यूए’चे सहसचिव प्रा. प्रवीण जावळे उपस्थित होते.
या प्रसंगी प्रा. पोपट जाधव यांना डॉ. एच. एम. कदम स्मृती पुरस्कार २०२५, डॉ. राजेंद्र पाटील व प्रा. सचिन इटकर यांना ‘एनपीडब्ल्यूए आयडॉल पुरस्कार २०२५’, तर चंद्रकांत वारघडे यांना वृक्षमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अध्यक्षस्थान भूषवणाऱ्या प्रा. डॉ. चोरडिया यांच्या हस्ते सर्व पाहुण्यांचा सूर्यदत्तचा स्कार्फ, पदक आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सोहळा सूर्यदत्तच्या बावधन कॅम्पसमधील बन्सीरत्न सभागृहात पार पडला.
२५० हून अधिक मान्यवरांच्या उपस्थितीत भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य स्व. डॉ. एच. एम. कदम आणि जेएसपीएम इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, ताथवडेचे प्राचार्य स्व. प्रा. प्रशांत हम्बर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
डॉ. चोरडिया म्हणाले, “गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवाबरोबरच त्यांच्या मनात अभिमान, प्रेरणा व जबाबदारीची भावना जागवणारा हा अविस्मरणीय सोहळा ठरला. फार्मोत्सवासारख्या व्यासपीठांमुळे आत्मविश्वास वाढतो व समाजसेवेची जाणीव दृढ होते.”
सुषमा चोरडिया यांनी आपल्या भाषणात, “कोणत्याही क्षेत्रात व्यावसायिक यश संपादन करण्यासाठी नवनिर्मितीची वृत्ती आणि समर्पित परिश्रम आवश्यक असतात. फार्मोत्सवासारख्या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये ही भावना बळकट होते,” असे मत व्यक्त केले.
प्रा. प्रवीण जावळे यांनी स्वागतप्रास्ताविक केले. ‘एससीपीएचआर’च्या प्राध्यापिका व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सारिका झांबड आणि अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रा. तस्लीम कुरेशी यांनी सूत्रसंचालन केले. डी. फार्मसी विभाग प्रमुख स्नेहल जाधव यांनी सहकाऱ्यांसह यशस्वी संयोजन केले.
