८ घरफोड्या उघडकीस, चोरीच्या पैशांमधून कार खरेदी, १४ लाख ७५ हजारांचा माल जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शहरातील वेगवेगळ्या भागात घरफोडी करणाऱ्या चोरट्याला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्याकडून ८ घरफोड्या उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. घरफोडीतून चोरलेल्या पैशांमधून त्याने कार खरेदी केली होती. त्याच्याकडून या कारसह १४ लाख ७५ हजार ६०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
रेवण उर्फ रोहन बिरू सोनटक्के (वय २४, रा. दिघी, आळंदी रोड) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. सोनटक्केकडून सिंहगड रोड – ४, उत्तमनगर- २, विमाननगर, भारती विद्यापीठ परिसरातील प्रत्येकी एक असे घरफोडीचे आठ गुन्हे केल्याचे उघडकीस आले.
सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर येथील आशिष अपार्टमेंटमध्ये झालेल्या घरफोडीचा तपास सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील तपास पथक करत होते. घरफोडीचा गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले.
चोरटा काळे जॅकेट, काळे हेल्मेट परिधान करून मध्यरात्री २ ते ५ या वेळेत घरफोडी करत असल्याचे निष्पन्न झाले. या आरोपीच्या येण्या-जाण्याचे मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दीड महिन्यांच्या कालावधीनंतर त्याचा माग काढण्यात यश आले.
त्याच्या पाळतीवर लावलेल्या खास बातमीदाराने पोलीस अंमलदार देवा चव्हाण, राहुल ओलेकर, निलेश भोरडे यांना बातमी दिली की, हा चोरटा दिघी रोडवरील राधानगरी सोसायटी येथे थांबला आहे. या बातमीबरोबर पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर व त्यांचे सहकारी तातडीने तेथे गेले. त्यांनी रेवण सोनटक्के याला ताब्यात घेतले.
अधिक चौकशीत त्याने ८ घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ५ लाख ७१ हजार १५० रुपयांचे दागिने जप्त केले. तसेच घरफोडीतून मिळालेल्या रक्कमेतून त्याने ६ लाख ७० हजार रुपयांची हुंडाई कंपनीची कार विकत घेतली.
तिच्यावर १ लाख ८२ हजार रुपयांचे अॅक्सेसरीज व दुरुस्तीसाठी खर्च केला. ही कार जप्त करण्यात आली. तसेच गुन्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी वापरलेली दुचाकी, घरफोडीसाठी वापरलेले बोल्ट कटर, हातोडी, स्क्रूड्रायव्हर, मास्क, हॅण्डग्लोज असा एकूण १४ लाख ७५ हजार ८०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाइंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय शिंदे, पोलीस अंमलदार उत्तम तारु, अण्णा केकाण, विकास बांदल, देवा चव्हाण, राहुल ओलेकर, निलेश भोरडे, सागर शेडगे, विनायक मोहिते, गणेश झगडे, सतिश मोरे, समीर माळवदकर, संदीप कांबळे, तानाजी सागर यांनी केली आहे.
सराईत घरफोड्या करणारा चोरटा – रेवण उर्फ रोहन सोनटक्के हा सराईत चोरटा असून, त्याच्याविरुद्ध घरफोडीचे १७ गुन्हे दाखल झाले आहेत. पुणे, कोल्हापूर, नवी मुंबई आणि पुणे जिल्ह्यात त्याने घरफोडीचे गुन्हे केले आहेत.
