गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाची कामगिरी : वाघोली येथे कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बेकायदा गावठी बनावटीची पिस्तुले बाळगणाऱ्या, जामिनावर बाहेर असलेल्या ४ गुन्हेगारांकडून गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने ४ पिस्तुलांसह ५ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. नगर रोडवरील वाघोली परिसरात ही कारवाई करण्यात आली.
सूरज उर्फ नन्या संतोष मोरे (वय १९) आणि ओंकार अरुण नादवडेकर (वय १९, दोघे रा. गुलमोहोर पार्क, बकोरी फाटा, वाघोली, नगर रोड), जगदीश उर्फ जॅक शंकर दोडमणी (वय २४) आणि स्वयंम उर्फ अण्णा विजय सुर्वे (वय १९, दोघे रा. पांडू लमाण वस्ती, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
सूरज मोरे याच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात २०२३ व २०२४ मध्ये दोन गुन्हे दाखल आहेत. ओंकार नादवडेकर याच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात २०२३ मध्ये एक गुन्हा दाखल आहे. जगदीश दोडमणी याच्यावर लष्कर पोलीस ठाण्यात २०२४ मध्ये खुनाचा तसेच येरवडा पोलीस ठाण्यात २०२४ मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पोलीस अंमलदार नितीन धाडगे व निर्णय लांडे हे गस्त घालत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सूरज मोरे व ओंकार नादवडेकर यांना वाघोली येथील भावडी रोडवरील भैरवनाथ तळ्याजवळ पकडले. त्यांच्याकडून १ गावठी पिस्तुल व १ जिवंत काडतूस जप्त केले.
चौकशीत मोरे आणि नादवडेकर यांच्या मित्रांकडे दोडमणी आणि सुर्वे यांच्याकडे पिस्तुले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने दोडमणी आणि सुर्वे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ पिस्तुले व ४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. चौघांकडून एकूण १ लाख ६२ हजार रुपयांची ४ पिस्तुले व ५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक राकेश कदम, मदन कांबळे, पोलीस अंमलदार सारंग दळे, बाळासाहेब सकटे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीश नाणेकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, सुहास तांबेकर, ऋषिकेश ताकवणे, नितीन धाडगे, निर्णय लांडे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, नेहा तापकीर, प्रतिक्षा पानसरे, कीर्ति मांदळे, सोनाली नरवडे यांनी केली आहे.
सराईत गुन्हेगाराकडून गावठी कट्टा जप्त
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तौकीर रफिक शेख (वय १९, रा. कोंढवा) याला पकडून त्याच्याकडून ५० हजार रुपयांचा गावठी कट्टा जप्त केला आहे. पोलीस पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना याबाबत गोपनीय माहितीदारामार्फत बातमी मिळाली होती. त्यानुसार सर्प उद्यानाकडून मोरे बाग बसस्टॉपकडे जाणाऱ्या रोडवरील फुटपाथवर थांबलेल्या तौकीर शेख याला पकडण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
