टास्क, शेअर मार्केटच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सायबर चोरांकडून टास्क देऊन गुंतवणूक करायला लावणे, शेअर मार्केटमधून चांगला परतावा मिळवून देण्याच्या नावाखाली दररोज सर्वसामान्यांची फसवणूक केली जात आहे. नागरिक देखील किरकोळ आमिषाला बळी पडत लाखो रुपये सायबर चोरांच्या हवाली करत आहेत. अशाच तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सायबर चोरांनी ४२ लाख ९१ हजार ६७४ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
धनकवडी येथील ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला त्यांच्या मोबाईलवर सायबर चोरांनी संपर्क साधला. त्यांना प्ले स्टोअरवरील एक अॅप इन्स्टॉल करण्यास भाग पाडून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सांगितले.
सुरुवातीला त्यांना थोडा नफा देऊन विश्वास संपादन केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने ३० लाख ४५ हजारांची गुंतवणूक केली. त्यानंतर त्यांना कोणताही परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. हा प्रकार १ डिसेंबर २०२४ ते २० जानेवारी २०२५ दरम्यान घडला.
याप्रकरणी ज्येष्ठ नागरिकाच्या फिर्यादीवरून सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक (गुन्हे) नीलेश जगदाळे तपास करत आहेत. लोहगाव येथील ३८ वर्षीय नागरिकाला सायबर चोरांनी संपर्क करून टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले.
सुरुवातीला परतावा देऊन विश्वास संपादन केल्यानंतर चोरांनी फिर्यादींना १० लाख ६६ हजार ६७४ रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर फिर्यादीला कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा प्रकार १९ ते २५ मे २०२५ दरम्यान घडला.
याप्रकरणी विमाननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक शरद शेळके तपास करत आहेत. वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली कोंढव्यातील २८ वर्षीय युवकाची १ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर चोरांनी युवकाला एक लिंक पाठवून त्यातील फोटोवर रिव्ह्यू देण्यास सांगितले. त्यावर काही प्रमाणात युवकाला परतावा देखील देण्यात आला. त्यानंतर जादा परताव्यासाठी तरुणाने १ लाख ८० हजार रुपये विविध यूपीआय आयडीवर पाठवले.
त्यानंतर त्याला कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम परत न मिळाल्याने त्याने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. हा प्रकार २२ जुलै रोजी घडला. हा तपास पोलिस निरीक्षक वर्षा देशमुख करत आहेत.
ही घ्यावी काळजी –
> शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर सोशल मीडियावरून येणाऱ्या लिंकवर जाऊन त्यावरून अॅप डाउनलोड करू नये.
> सायबर चोरट्यांकडून पाठविलेल्या लिंक किंवा ग्रुपमधील लोकांच्या सल्ल्यावर विश्वास ठेवू नये. अशा व्हॉट्सअॅप ग्रुपवर त्यांचीच लोक बनावट नावाने फायदा झाल्याचे मेसेज टाकत असतात. त्याला भुलू नये.
> शेअर बाजारात पैसे गुंतवायचे असतील तर आपल्या माहितीतील ब्रोकरशी संपर्क साधून त्याच्या सल्ल्याने गुंतवणूक करावी. कोणाच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे पाठवू नयेत.
> फोटोला रेटिंग दिल्याने कोणाला काही मिळत नाही. हे काही काम नसते. त्यामुळे अशा वर्क फ्रॉम होमला भुलून जाऊ नये.
