लॅपटॉप चोरट्याकडून लोणी काळभोर पोलिसांनी जप्त केले २ लाखांचे ५ लॅपटॉप
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : जड सॅक पाठीवर लावून फिरणाऱ्या तरुणाची लोणी काळभोर पोलिसांना माहिती मिळाली. त्याचा शोध घेत असताना पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. पाठीवर जड ओझे असल्याने पळताना ठेच लागून तो पडला. पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडील सॅकमध्ये २ लाखांचे ५ लॅपटॉप मिळाले. चौकशी करता त्याने वाघोलीमधील एका उघड्या दरवाजातून आत शिरून पहाटे लॅपटॉप चोरल्याचे सांगितले. वाघोली पोलीस ठाण्यात अजून गुन्हा दाखल झाला नव्हता, त्याआधीच चोरटा मुद्देमालासह पोलिसांच्या हाती सापडला होता.
सागर नागराज (वय ३१, रा. महादनुर, ता. अंबुर, जि. वेल्लूर, तामिळनाडू) असे या चोरट्याचे नाव आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अंमलदार शिरगिरे व कुदळे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पुणे-सोलापूर रोडवरील चिंतामणी पार्क प्लॉटिंगजवळ एक जण संशयितपणे पाठीवर जड वजनाची बॅग घेऊन फिरत आहे.
या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथक त्या परिसरात शोध घेत होते. त्यावेळी कुंजीरवाडी येथे पोलिसांना तो दिसला. त्याची आणि पोलिसांची नजरानजर होताच तो पळून जाऊ लागला. पोलीस त्याचा पाठलाग करत असताना पाठीवर जड ओझे असल्याने धावताना त्याला ठेच लागली व तो खाली पडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
त्याच्या पाठीवरील सॅकमध्ये ५ लॅपटॉप मिळाले. त्याबाबत त्याला माहिती देता आली नाही. अधिक चौकशीत त्याने १२ ऑगस्टला पहाटे वाघोली येथून हे लॅपटॉप चोरल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी लॅपटॉप बाबत वाघोली पोलिसांकडे चौकशी केली. तेव्हा त्यांच्याकडे लॅपटॉप चोरीचा गुन्हा दाखल होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सागर नागराज याने वाघोली येथील गाडेवस्तीमधील ऑक्सी व्हॅली फेज २ येथील भगवंत कॉम्प्लेक्स डी मधील रूममधून १२ ऑगस्टला पहाटे २ वाजता १ लाख ९५ हजार २२१ रुपयांचे ४ लॅपटॉप चोरून नेले होते.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार सातपुते, वणवे, भोसले, माने, जगदाळे, देवीकर, शिरगिरे, कुदळे, वीर, पाटील, कुंभार, गाडे, कर्डिले, सोनवणे, दडस, थोरात यांनी केली आहे.
