मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत पीएमआरडीए मुख्यालयात सविस्तर चर्चा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या टीपी (टाउन प्लॅनिंग) स्कीम व रिंग रोड प्रकल्पासंदर्भातील शंका, अडचणी आणि उपाययोजनांवर पीएमआरडीए मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत रिंग रोड, टीपी स्कीम, शेती झोनचे निवासी झोनमध्ये रूपांतर, वगळलेली क्षेत्रे, जुन्या आर.पी. व स्ट्रक्चरल प्लॅनवरील सूचना तसेच विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीत मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके उपस्थित होते. यावेळी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत टीपी स्कीमचे फायदे स्पष्ट केले.
त्यांनी सांगितले की, या योजनेमुळे सर्व क्षेत्र ‘यलो झोन’मध्ये समाविष्ट होऊन रस्ते, पाणीपुरवठा, गटारी, शाळा अशा पायाभूत सुविधा नियोजनबद्ध उभारल्या जातील आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन लाभ मिळेल.
बैठकीत धामणे, गोदुंबरे, दारुंबरे/साळुंब्रे, सांगवडे, नेरे या गावांमधील प्रस्तावित नगररचना योजनेबाबतच्या तरतुदींचा आढावा घेण्यात आला.
या चर्चेत अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील, नगररचना विभागाच्या सह-महानगर नियोजनकार श्वेता पाटील तसेच पीएमआरडीएचे इतर अधिकारी, कर्मचारी आणि मावळ तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
