सुहाना फिरती विज्ञान प्रयोगशाळेचा हस्तांतरण सोहळा; ग्रामीण विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षणासाठी नवे साधन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : मानवाच्या उत्क्रांतीपासून विज्ञान व तंत्रज्ञान हे मानवी प्रगतीचे आधारस्तंभ राहिले असून आजच्या घडीला ते जीवनाचा पाया असल्याचे प्रतिपादन इस्रोच्या संशोधन व विकास विभागाचे माजी संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरूणकुमार सिन्हा यांनी केले. प्रवीण मसालेवाले ट्रस्टतर्फे रूपांतरित केलेल्या दोन बस ‘सुहाना फिरती विज्ञान प्रयोगशाळा’च्या हस्तांतरण सोहळ्यात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आयसर पुणेच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. अपर्णा देशपांडे, वरिष्ठ शैक्षणिक तज्ज्ञ डॉ. दिलीप देशमुख, प्रवीण मसालेवाले ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त व उद्योगसमूहाचे अध्यक्ष राजकुमार चोरडिया, विश्वस्त प्रदीप चोरडिया तसेच ज्ञान प्रबोधिनी हराळी केंद्राचे अभिजित कापरे आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे डॉ. प्रताप रामराव पाटील उपस्थित होते.
या बस अनुक्रमे ज्ञान प्रबोधिनी हराळी केंद्र व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आल्या. डॉ. अरूणकुमार सिन्हा यांनी सांगितले की, स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विज्ञान व तंत्रज्ञानाला प्राधान्य देत हरितक्रांतीपासून उपग्रह विज्ञानापर्यंत अनेक प्रयोगांना चालना दिली.
इंदिरा गांधींनीही या वाटचालीला बळ दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल क्रांती घडवून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने देशाला नेले आहे. इस्रोने पुढील पाच वर्षांत ५२ उपग्रह सोडण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यातून दळणवळण, कृषी, आरोग्य, पर्यावरण अशा सर्व क्षेत्रांत प्रगती साधली जाईल.
डॉ. अपर्णा देशपांडे यांनी ग्रामीण भागातील मुलांना विज्ञानाची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी ही फिरती प्रयोगशाळा मोठी संधी ठरेल, असे सांगितले. तसेच, संस्थांनी स्थानिक पातळीवर सहाय्यव्यवस्था निर्माण करून हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवावा, असे आवाहन केले.
कार्यकारी विश्वस्त राजकुमार चोरडिया यांनी ग्रामीण शाळांमधील प्रयोगशाळा सुविधा अपुरी असल्याचे सांगत, या पार्श्वभूमीवर ज्ञान प्रबोधिनी हराळी केंद्र व परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या मागणीनुसार दोन जिल्ह्यांसाठी फिरत्या प्रयोगशाळा विकसित केल्याचे सांगितले.
या प्रयोगशाळांमध्ये इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या विज्ञान अभ्यासक्रमासाठी अत्याधुनिक साहित्य, रसायने, कृत्रिम बुद्धिमत्ता व खगोलशास्त्र विषयांचा समावेश, वातानुकूलन, सीसीटीव्ही, जीपीआरएस, बॅटरी बॅकअप, लॅपटॉप, प्रोजेक्टर, साऊंड सिस्टीम आदी सुविधा उपलब्ध आहेत.
वर्षातून दोनदा सेवा देणाऱ्या या प्रयोगशाळांद्वारे सुमारे २०० शाळांतील २० हजार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे विज्ञान शिकण्याची संधी मिळेल. कार्यक्रमात डॉ. दिलीप देशमुख, प्रदीप चोरडिया, अभिजित कापरे व डॉ. प्रताप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. आभार पोपट काळे यांनी मानले.


















