शिवाजीनगर पोलिसांनी हरविलेले ४१ मोबाईल परत मिळवून दिले
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना स्वातंत्र्य दिनी पोलिसांनी एक विशेष भेट दिली. हरविलेले ५ लाख रुपयांचे ४१ मोबाईल शिवाजीनगर पोलिसांनी परत मिळवून ते नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात समारंभपूर्वक परत केले.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस अंमलदार तेजस चोपडे व आदेश चलवादी यांनी शिवाजीनगर परिसरात हरवलेल्या मोबाईलचा डेटा तयार करून त्याबाबत तांत्रिक तपास करून तसेच वारंवार पाठपुरावा करून हरविलेले मोबाईल फोन हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात व इतर राज्यात वापरले जात असल्याचे निदर्शनास आले.
हे मोबाईल जे वापरत होते, त्यांच्याशी संपर्क साधून हरविलेले ५ लाख रुपयांचे ४१ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. हे हस्तगत केलेले मोबाईल फोन संबंधित तक्रारदारांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले व सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या हस्ते परत करण्यात आले.
मोबाईल हरवल्याची तक्रार तात्काळ ऑनलाईन पुणे पोलिसांच्या punepolice.gov.in/lostfoundReg या वेबसाईटवर नोंद करावी. नोंद करताना जवळच्या पोलीस ठाण्याचे नाव सिलेक्ट करावे. त्यानंतर आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन त्याची एक प्रत द्यावी.
हरविलेल्या मोबाईलमधील त्याच नंबरचे सिमकार्ड घेऊन ते चालू केल्यानंतर शासनाच्या https://www.ceir.gov.in/ (CEIR) या पोर्टलवर नोंद करावी. नोंद करताना या वेबसाईटवर अर्जदाराची तक्रारीची प्रत, मोबाईल पावती तसेच ओळखपत्र याची PDF अपलोड करून चालू केलेल्या मोबाईलवर OTP प्राप्त करून सबमिट करावी.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) धनंजय पिंगळे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनिषा वलसे, पोलीस हवालदार नलिनी क्षीरसागर, पोलीस अंमलदार आदेश चलवादी, तेजस चोपडे, नवनाथ आटोळे यांनी केली आहे.


















