मोबाईलमधील फोटोवरून खंडणी विरोधी पथकाची कात्रज भागात कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शौक म्हणून पिस्तुल बाळगणाऱ्या दोघा तरुणांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे, ओला दुचाकी आणि मोबाईल असा एकूण २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक केलेल्यांची नावे शुभम राजेंद्र बेलदरे (वय २९, रा. राजमुद्रा निवास, दत्तनगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव) आणि मयुर ज्ञानोबा मोहोळ (वय २३, रा. अभिरुची परिसर, धायरी-नर्हे रोड) अशी आहेत. या प्रकरणी पोलीस अंमलदार मयुर राजेंद्र भोकरे यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, हवालदार रणजित फडतरे, रहिम शेख, विजय कांबळे, दुर्योधन गुरव, पोलीस अंमलदार मयुर भोकरे आणि नितीन बोराटे हे अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी १४ ऑगस्ट रोजी पेट्रोलिंग करत होते.
त्यावेळी पोलीस अंमलदार भोकरे व हवालदार शेख यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मयुर मोहोळ हा पिस्तुल बाळगून फिरत आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन आंबेगाव येथील दुर्गा रेस्टॉरंटजवळ त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडे पिस्तुल न मिळाल्याने त्याचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये त्याचा पिस्तुलासह फोटो आढळून आला. त्यावर चौकशी केली असता त्याने पिस्तुल शुभम बेलदरे याच्याकडे ठेवले असल्याचे सांगितले.
यानंतर पोलिसांनी शुभम बेलदरेचा शोध घेतला असता तो साई लेक व्ह्यू सोसायटीजवळील जांभुळवाडी तलावाच्या कट्ट्यावर ओला गाडीसह थांबलेला आढळला. सुरुवातीला त्याने पिस्तुल नाकारले, मात्र मोबाईल फोटो दाखवल्यावर त्याने पिस्तुल गाडीच्या डिकीत ठेवल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी डिकीतून देशी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली.
याशिवाय पोलिसांनी ओला गाडी आणि मोबाईल मिळून २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कळमकर करीत आहेत.
