सावित्रीबाई फुले वसाहतीतील घटना : सहकारनगर पोलिसांनी केली मुलाला अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने झोपेत असलेल्या आईच्या छातीत चाकूने वार करून तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कौशल्या पप्पु कांबळे (वय ५५, रा. सावित्रीबाई फुले वसाहत, सिंहगड रोड) असे गंभीर जखमी झालेल्या आईचे नाव आहे. याबाबत तिचा मोठा मुलगा बाबासाहेब पप्पु कांबळे (वय ३६) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी त्यांचा लहान भाऊ कृष्णा पप्पु कांबळे (वय ३०) याला अटक केली आहे.
ही घटना त्यांच्या राहत्या घरी पहाटे साडेचार वाजता घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाबासाहेब कांबळे हे रिक्षाचालक असून सावित्रीबाई फुले वसाहतीत ते, आई, भाऊ आणि पत्नीसह राहतात.
त्यांचा लहान भाऊ कृष्णा हा आईसोबत दारु साठी पैसे देण्याच्या कारणावरून सतत वाद घालत असतो. त्याला समजावून सांगण्यासाठी त्यांचे मामा धोंडीराम सरवदे हे घरी आले होते. जेवण झाल्यावर रात्री साडेनऊ वाजता कृष्णाने आईकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. तिने नकार दिला.
त्यामुळे कृष्णा रागात “तुला संपवतोच” असे म्हणत घरातून निघून जात असताना मामाने त्याला घरात घेतले. दरवाजा आतून बंद केला. फिर्यादी व मामाने त्याला खूप समजावले व बेडवर झोपायला सांगितले. तो बेडवर जाऊन झोपला. ते तिघे खाली झोपले. थोड्या वेळाने कृष्णा खाली येऊन आईशेजारी झोपला.
पहाटे साडेचार वाजता आईच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी उठून पाहिले तेव्हा कृष्णाच्या हातात चाकू होता. आईला काय झाले हे पाहिले असता कृष्णाने आईच्या छातीवर चाकूने वार केला होता. त्यांनी आईला तातडीने रुग्णालयात नेले. पोलिसांनी कृष्णा कांबळे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक इस्माईल शेख तपास करीत आहेत.


















