सेवानिवृत्त पोलीस अंमलदार आणि ज्येष्ठ नागरिकाच्या अमेरिकेतील मुलाची फसवणूक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सायबर क्राईममध्ये डिजिटल अरेस्ट असा कोणताही प्रकार नसल्याचे लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन हे जाहिरातीतून लोकांना सांगत असतात. केंद्र सरकारनेही त्यांच्या आवाजातील रिंग टोन लावून लोकांना सायबर चोरट्यांपासून सावध राहण्यासाठी जनजागृती केली आहे.
तरीदेखील पुण्यातील सुशिक्षित नागरिक त्याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून आले. डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगून एका सेवानिवृत्त पोलीस अंमलदाराला २४ लाखांचा गंडा घालण्यात आला, तर एका ज्येष्ठाच्या अमेरिकेतील मुलाला तब्बल ४५ लाखांना फसवण्यात आले आहे.
याबाबत वारजे येथे राहणारे ६९ वर्षीय सेवानिवृत्त पोलीस अंमलदार यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावरील मोबाईलवर ९ ऑगस्ट रोजी प्रदीप जयस्वाल नाव सांगणाऱ्या व्यक्तीचा व्हॉट्सअॅप कॉल आला.
त्याने आपण डाटा फायनान्स ऑफ इंडिया मधून बोलत असल्याचे सांगून, “तुम्ही पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या दहशतवादी संघटनेमध्ये सामील आहात. तुमच्यावर नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात मनी लॉन्ड्रिंगची केस आहे आणि तुमच्यावर अरेस्ट वॉरंट आहे,” असे सांगितले.
त्यावेळी त्यांनी आपले पती, सेवानिवृत्त पोलीस अंमलदार, यांच्याकडे फोन दिला. त्यांना फोन करणाऱ्याने अँटी करप्शन डिपार्टमेंट मधून वरिष्ठ अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांच्या नावावर नोंद असलेल्या नोटीशीचा फोटो पाठविण्यात आला.
त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. पुढे तो बोलला, “तुम्ही रिटायर्ड पोलीस ऑफिसर असल्याने आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करू. तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आले आहे. तुमच्या बँक खात्यांची पडताळणी करायची आहे.”
९ ते १३ ऑगस्टदरम्यान त्यांना डिजिटल अरेस्ट केल्याचा भास निर्माण करून त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या खात्यातील २४ लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पाठविण्यास भाग पाडण्यात आले.
दुसऱ्या प्रकरणात, मूळचे अमरावती येथील ७० वर्षीय नागरिकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार ४ एप्रिल ते १६ मे २०२५ दरम्यान घडला. फिर्यादी यांचे कोरेगाव पार्क येथील ॲक्सिस बँकेत खाते आहे. त्यांचा मुलगा अमेरिकेत असताना वेगवेगळ्या फोन नंबरवरून त्याला सांगण्यात आले की, “तुझ्या नावाने भारतात तुझे आधार कार्ड व सिमकार्ड वापरून अनेक बँक खाती उघडण्यात आली आहेत.”
हे कॉल भारतीय दूतावास, वॉशिंग्टन तसेच मुंबई सायबर क्राईम कार्यालयातून येत असल्याचा भास त्याला देण्यात आला. तसेच, त्याला “तुझ्या विरोधात डिपोर्टेशनचा आदेश आहे” असे सांगून धमकावण्यात आले. आरोपींनी फिर्यादीच्या मुलाला सतत दोन महिने धमकावून आरटीजीएसद्वारे ४५ लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर ट्रान्सफर करण्यास भाग पाडून फसवणूक केली.
या दोन्ही प्रकरणांचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे करीत आहेत.
